भुसावळ येथे इव्हीएम मशिन पळविल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:11 PM2019-04-24T18:11:05+5:302019-04-24T18:13:44+5:30
भुसावळ येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महसूल प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने जमाव पांगवला.
भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वे दवाखान्याजवळील नॉर्थ कॉलनी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ४२ बाहेर ईव्हीएम मशिन बदलविण्याच्या संशयावरून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली. बुुुथ बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महसूल प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने जमाव पांगवला. दरम्यान, झोनल अधिकारी आर.एम.महाजन यांना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी नोटीस बजावली आहे.
मतदान केंद्र ४२ येथे झोपन अधिकारी आर.एम.महाजन यांच्या चार चाकी वाहन क्रमांक एमएच-१९-६२२६ मध्ये तीन अतिरिक्त इव्हिएम मशीन हे मतदान केंद्रात न ठेवता बाहेर गाडीत ठेवले होते. मात्र, त्यांना चालकासह जेवणासाठी जायचे असल्याने त्यांनी गाडी क्रमांक एमएच-१९-सीव्ही-२१२७ मध्ये हे मशीन आपल्या मुलाकडे सोपवून सुरक्षित ठेवण्याचे सांगितले. त्यामुळे मुलाने ते मशीन आपल्या गाडीत ठेवण्यासाठी बाहेर काढले. तेव्हा परिसरातील कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातील इव्हीएमच बाहेर काढल्याचा संशय आल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी झोनल अधिकारी महाजन यांना विचारणा केली व इतर कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. त्यामुळे बुथ क्रमांक ४२ वर ईव्हीएम मशीन बदलण्यात येत असल्याची चर्चा परिसरात पसरली. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर चांगलीच गर्दी झाली.
यातूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी डीवाय.एस. पी. गजानन राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला झालेला प्रकार समजावून सांगितला आणि तणाव कमी केला, तर ईव्हीएम मशीन असलेल्या चार चाकी, झोनल अधिकारी महाजन यांसह तिन्ही मशिन ताब्यात घेतल्या व मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये जमा केल्या आहेत.
दरम्यान, प्रांताधिकारी श्रीकुमार चिचकर यांनी झोनल अधिकारी महाजन यांना नोटीस बजावली आहे.