पिंप्राळा हुडकोत ११ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:06+5:302021-04-28T04:17:06+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा काॅलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीचा ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील रझा काॅलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत मुलीच्या वडिलांवरच संशय व्यक्त करण्यात आला असून मामा अजहर अली शौकत अली (रा. अमळनेर) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कनीज हिचे वडील जावीद अख्तर शेख यांना पोलिसांनी मंगळवारी अमळनेर येथून ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, साहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे कनीजची आई, वडील, मामा व इतर नातेवाइकांची वेगवेगळी चौकशी केली.
मृतदेह उकरून पंचनामा व शवविच्छेदन करणार
मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दफनविधी केलेला मृतदेह उकरून पंचनामा तसेच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तहसीलदारांना पत्रही देण्यात आले. नायब तहसीलदार प्रदीप राजपूत व महसूल साहाय्यक किशोर ठाकरे हे दोघ जण दुपारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याशिवाय फॉरेन्सिक व्हॅनही बोलावण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध न झाल्याने ही प्रक्रिया बुधवारी केली जाणार आहे.
दफनविधीनंतर घराला लावले कुलूप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनीज हिचा २३ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. याच दिवशी वडील जावीद शेख यांनी तिचा दफनविधी केला. ही घटना त्याने कोणालाच सांगितली नाही. नंतर घराला कुलूप लावून पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन तो गायब झाला. त्यामुळे संशय बळावला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कनीजच्या मामांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते कुठेही मिळून आले नाहीत. शेवटी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी जावीद शेख याला अमळनेर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
अपशकुन मानून मुलीचा छळ
कनीज हिच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार, कनीज जन्माला आली तेव्हा जावीद शेख याच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी मेडिकलच्या साहित्याला आग लागली होती. या दोन्ही घटनांमुळे कनीज अपशकुनी ठरत आहे, असा समज जावीद याचा झाला होता. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता. त्यामुळे मामांनी तिला त्यांच्याकडे घेतले. आठ वर्षे ती मामांकडे राहिली. तीन वर्षांपासून ती आई-वडिलांकडे होती. एकापाठोपाठ तीन मुली झाल्या, मुलगा न झाल्याने तेदेखील सतत त्याच्या डोक्यात असायचे, असेही अजहर यांनी सांगितले.