महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक

By विजय.सैतवाल | Published: March 2, 2024 11:34 PM2024-03-02T23:34:35+5:302024-03-02T23:35:01+5:30

चारित्र्यावर संशय घेत छळ केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप

Suspicious death of woman, case against seven in-laws; Both were arrested | महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना अटक

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: चारीत्र्यावर संशय घेत वारंवार छळ केला जात असल्याने जुलेखा गफ्फार पटेल (२८, रा. भादली, ता. जळगाव) या महिलेने शनिवार, २ मार्च रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून तिला सासरच्या मंडळींनीच मारले असल्याचा आरोप व तशी फिर्याद विवाहितेच्या भावाने दिल्याने नशिराबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जणांना अटक करण्यात आले आहे.

तालुक्यातील भादली येथील जुलेखा पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. दोन मुले असल्याने ही महिला सासरीच राहत होती. शनिवार, २ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आहे. या विषयी सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. त्यानुसार माहेरील मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह स्वत: न आणता रिक्षात पाठवून दिल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे होते.

घातपात केल्याचा आरोप

जुलेखा पटेल यांनी आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनीच त्यांना मारले असल्याचा आरोप मयत महिलेच्या भावासह इतर नातेवाईकांनी केला. त्यामुळे जो पर्यंत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ हासीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासू असरफ मुसा पटेल, जेठ कालू उर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे.

१० तास रुग्णालयात थांबून

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेच्या माहेरची मंडळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहचले होते. सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही व अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने या सर्व प्रक्रियेदरम्यान मृतदेह १० तास शवविच्छेदनगृहातच होता. तसेच सर्व मंडळी तोपर्यंत रुग्णालयात थांबून होते. गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला व माहेरी नेण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

Web Title: Suspicious death of woman, case against seven in-laws; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक