रुपयाने वाढविली सुवर्णनगरीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:31 PM2019-08-11T12:31:05+5:302019-08-11T12:31:27+5:30
सोन्याचा नवा उच्चांक
विजयकुमार सैतवाल
जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहचून ते ३७ हजाराच्या पुढे जात चांदीचेही भाव वाढलेले आहे. रुपयामध्ये होत असलेली घसरण सुवर्णनगरी जळगावची चिंता वाढवित आहे.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच त्यात भरात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या सहा वर्षातील एकाच वेळी (एक रुपया १० पैसे) वाढलेले भावही कारणीभूत ठरत आहे. ५ आॅगस्ट रोजी ६९.६५ रुपयांवर असलेले डॉलरचे भाव ६ रोजी ७०.७५ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोन्याचेही भाव थेट ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढले. ३५ हजार ८०० रुपये प्रती तोळा असलेले सोने वरील सर्व कारणांमुळे थेट ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे.त्यानंतर पुन्हा वाढ होऊन हे भाव ३७ हजार ३५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. सोबतच चांदीचे भाव एक हजार रुपये प्रती किलोने वाढून ४२ हजार ५०० रुपयांवर पोहचले.
यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व जून महिन्याच्या शेवटी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतरही भाववाढ अशीच सुरू राहून ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते आता ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. सोन्याच्या भावाचा हा उच्चांक असल्यचे म्हटले जात आहे.
या पूर्वी सहा वर्षांपूर्वी सोने ३५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर ते खाली आले होते व पुन्हा या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये ते ३५ हजारावर पोहचले होते. आता तर थेट ३७ हजाराचा पल्ला सोन्याने ओलांडला आहे.