सुवर्णस्पर्शी मत्स्यगंधा नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:30+5:302021-05-29T04:13:30+5:30
प्रा. वसंत कानेटकर यांचं नाव घेतल्यावर रायगडाला जेव्हा जाग येते, हिमालयाची सावली, वेड्याचं घर उन्हात, दोन ध्रुवांवर दोघे आपण, ...
प्रा. वसंत कानेटकर यांचं नाव घेतल्यावर रायगडाला जेव्हा जाग येते, हिमालयाची सावली, वेड्याचं घर उन्हात, दोन ध्रुवांवर दोघे आपण, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड जाहली, नल-दमयंती, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचंय, इथे ओशाळला मृत्यू अशी कितीतरी प्रभावी कथानकाची विविध नाटके डोळ्यांपुढे येतात. पण, कानेटकर फक्त नाटककार नव्हते तर एकांकिका, कादंबऱ्या, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, आत्मकथा असे विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. प्रा. कानेटकर यांचं नाव वसंत शंकर कानेटकर. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील. त्यांच्या वडिलांचं नाव शंकर केशव कानेटकर म्हणजेच कवी गिरीश. आपल्या वडिलांच्या लेखनाचा प्रभाव वसंतरावांच्या साहित्यात उतरला होता. त्यांचं सर्वच साहित्य माहितीपूर्ण, उद्बोधक आणि वाचनीय आहे. म्हणूनच ते विविध नात्यानं आपल्या समोर येतात. वसंतरावांचे शिक्षण रहिमतपूर, पुणे व सांगली येथे झाले. एम.ए. झाल्यावर त्यांनी नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयात २५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. लेखनाचा पिंड असल्याने कानेटकर लेखन करतच होते. कथा- कादंबऱ्यांकडून ते नाटकाकडे वळले. नाट्यलेखनासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. यांच्या कादंबऱ्या संवादप्रधान होत्या. ते आपलं लेखन आधी आपल्या पत्नीला दाखवत. एकदा त्यांची पत्नी म्हणाली, तुमचं लेखन हे संवादात्मक आहे तर तुम्ही नाटक का लिहीत नाही? मग त्यांनी नाटकं लिहायला सुरुवात केली आणि सामान्य वाचकांच्या जाणिवा समृद्ध करून आपल्या प्रतिभेने रसिकांना दिपवून टाकले. अनेक गद्य नाटके लिहिल्यावर संगीत नाटक लिहिण्याचे कानेटकरांचे स्वप्न ‘मत्स्यगंधा’ या नाटकामुळे सफल झाले.
अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारत पारंपरिकता आणि नवता यांचा सुमेळ सांगितिक अंगाने या नाटकात सिद्ध झाला.
या नाटकाचा प्रथम प्रयोग १ मे १९६४ रोजी मुंबई येथे झाला. कानेटकर यांनी ‘मत्स्यगंधा’ लिहिताना सोपी वाट न पकडता त्या कथेचा आशय, त्यातून प्रकट होणारी जीवनमूल्ये आणि असामान्य व्यक्तिरेखा यांच्या चित्रणावर भर दिला. कानेटकर यांना मुळात उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं प्रचंड आकर्षण होतं. ‘मत्स्यगंधा’सारख्या शोकात्म, गंभीर आशयाला पारंपरिक संगीत नाटकाच्या चौकटीत बसवणे हे सोपं काम नव्हतं. कानेटकरांनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेललं. मत्स्यगंधा नाटकातील वडिलांची आज्ञा शिरोधार्ह मानणारा, आजन्म ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे एकाकी यातना सहन करणारा भीष्म, आपल्या सौंदर्याचा गर्व बाळगणारी, महत्त्वाकांक्षेनं झपाटलेली आणि शेवटी पराभूत झालेली सत्यवती रेखाटताना कानेटकरांच्या प्रतिभेने फार मोठी उंची गाठली. उत्कृष्ट व्यक्ती रेखाटनाबरोबरच कानेटकरांची नाटक या माध्यमावरील पकड, रचनाकौशल्य, पौराणिक नाटकाचा डौल सांभाळणारी समृद्ध भाषा आणि नाट्यमय संवाद यामुळे नाटकाचं वाङ्मयीन मूल्य कितीतरी पटीनं वाढलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली.
या नाटकातील पदांसाठी जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले आहे. त्यांच्या अभ्यासातून त्यांची स्वरप्रतिभा दिसते. त्यांनी यातील
नाट्यपदांना एका नव्या स्वर कोंदणात स्थापित केले आहे. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’चा ‘यमन’ हा अत्यंत प्रसन्न करणारा राग. अभिषेकींच्या प्रतिभेचे पूर्णत्वाने दर्शन घडवणारी ही स्वररचना तीव्र माध्यमावरील ‘सम’रसिकांच्या काळजाला जाऊन भिडते. ‘विचित्र नेमानेम’ यामधील अनाकलनीय गूढ भाव या तीव्र माध्यमामुळेच प्रकट होतो. यातील सगळीच गाणी (उदा. गुंतता हृदय हे, साद देती हिमशिखरे, नको विसरू संकेत मिलनाचा, गर्द सभोवती रान साजणी, अर्थशून्य भासे मज हा, तव भास अंतरा झाला, अशी सर्व लोकप्रिय गीते) रसिकांनी आपलीशी केली.
-विशाखा देशमुख, जळगाव