राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:39 PM2018-01-17T17:39:30+5:302018-01-17T17:42:28+5:30
चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १२३ खेळाडुंचा सहभाग
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव: दि.१७ : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आणि आॅल मराठी चेस असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व्हिज्युअली चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता ठरला. राज्यभरातुन १२३ खेळाडुंनी सहभाग नोंदविला.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात स्वप्निल शहा (मुंबई) प्रथम तर मिलिंद सामंत (पुणे) द्वितीय, मदन बागायतदार (मुंबई) तृतीय, विकास शितोळे (पुणे) चतुर्थ, नवनाथ बोगडे (पुणे) पाचवा यांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
समारोप कार्यक्रमात आमदार उन्मेष पाटील यांनी अपयशातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. अंध खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार कैलास देवरे, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, चंद्रशेखर उपासनी, अजय दीक्षित, राष्ट्रीय बुद्धीबळ स्पधेर्चे पंच नरेंद्र ठाकरे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सचिव महादेव गोरे, अध्यक्ष महादेव गुरव, जनरल सेक्रेटरी वसंत हेगडे, आॅल इंडिया असोसिएशन फॉर दि व्हिज्युअली चॅलेंजचे पंकज बेंद्रे, सतीष पवार, सलिम पठाण, एम.बी. पाटील आदी उपस्थित होते. प्रास्तविक वसंत हेगडे यांनी केले. यशस्वीतेसाठी बाळासाहेब पवार, जयंत देवीभक्त, अभय कसबे, संजय घोडराव, अनिष गावित, ज्ञानेश्वर अल्हाटे, राजेंद्र सोनवणे, चिंतामण अहिरे यांनी सहकार्य केले.
चेकमेट मुळे उपस्थित भारावले
अंध खेळाडु बुद्धीबळ कसे खेळतात. या उत्सुकेतेपोटी स्पर्धेच्या वेळी शहरातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. डोळस खेळाडु देखील चांगल्या चाली करु शकणार नाहीत. अशा चाली अंध खेळाडुंनी केल्या. अंतिम लढतीत आठ फे-या झाल्या. स्वप्निल शहाच्या चेकमेटने स्पर्धेत रंगत वाढविली. त्याने साडेसात गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. स्पर्धेत प्रत्येकी पाचशे रुपयांची २० तर शाळा स्तरावरील १० खेळाडुंना बुद्धीबळ साहित्य देऊन गौरविण्यात आले.