चोरट्यांचा धुमाकूळ ; हजारोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:23 PM2020-10-23T23:23:12+5:302020-10-23T23:23:25+5:30
तीन ठिकाणी चोरी : शहरसह रामानंदनगर पोलिसात गुन्हा ; दागिने, भंगारसह अंत्यविधीच्या साहित्य केले लंपास
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोरीसह घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी शहरासह रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात चोरट्यांनी हजारो रूपयांचा ऐवज लंपास केला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्रमांक १:
सासू-सास-यांना रंग कामासाठी मदतीला गेलेल्या महिलेच्या घरी डल्ला (फोटो)
रामानंदनगर परिसरातील आरएमएस कॉलनी येथे ज्योती लिलाधर तायडे यांचे घर फोडून चोरट्यांनी १७ हजार ८०० रूपयांची ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी समार आली आहे. याप्रकरणी महिलेल्याचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरएमएस कॉलनीत ज्योती तायडे या विक्रम व नीलेश या दोन मुलांसह या वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. दोन्ही मुले शिक्षण घेत आहे. साड्या विक्रीचे काम करण्यासह हातमजुरीवर त्याचा उदरनिर्वाह भागतो. आठ दिवसांपासून ज्योती तायडे ह्या त्यांचे आशाबाबा नगर येथील सासरच्यांकडे घराला रंग काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना मदतीसाठी त्या मुलांसह त्याठिकाणी गेल्या होत्या. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास त्या आरएमएस कॉलनीतील घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर घरात जावून पाहिल्यानंतर त्यांना साडे सात हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानातले तसेच सातशे रूपयांचे चांदीचे दागिने व ९ हजार ६०० रूपयांच्या २४ साड्या व लेडीज ड्रेस आदी चोरीला गेल्याचे त्यांना दिसून आले. लागलीच या घटनेची माहिती त्यांनी रामानंदनगर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे रवींद्र पाटील व शिवाजी धुमाळ, विजय खैरे, उमेश पवार यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्रमांक २
काय तर...चोरट्यांनी लांबविले अंत्यविधीचे साहित्य
शिवाजी नगरात विर शैव लिंगायत समाजाची दफनभूमी असून त्याठिकाणी असलेल्या खोलीतून सुमोर पाच हजार रूपये किंमतीचे अत्यंविधीसाठी लागणारे साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. याबाबत सुभाष तोडकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विर शैव लिंगायत समाजाची शिवाजी नगरात दफनभूमी आहे. या स्मशानभूमीच्या देखरेख करण्यासाठी समाजाचे धर्मगुरू यांचेसाठी तीन खोली असलेले पत्र्याचे शेड बनविण्यात आलेले आहे. त्यातच स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंत्यविधीसाठी लागणा-या साहित्य ठेवण्यासाठी खोली बांध्ण्यात आली असून त्याठिकाणी टिकम, फावडा तसेच लोखंडी तगारी व प्रेत वाहून नेणारी एक लोखंडी डोली ठेवण्यात आली होती. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी विर शैव लिंगायत समाजाचे शहर अध्यक्ष सतिष ज्ञाने यांना स्मशानभूमीतील एका खोलीचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी लागलीच विर शैव मंडाळाचे संचालक सुभाष तोडकर यांना ही घटना सांगितली. नंतर दोघांनी खोली जावून पाहिले असता, अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. अखेर शुक्रवारी सुभाष तोडकर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्रमांक ३
पाणी पुरवठा युनिट कार्यालयाच्या आवारातून भंगार साहित्य लंपास
शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या पाणी पुरवठा युनिट कार्यालयाच्या आवारात ठेवलेले भंगार साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गेंदाला मिल परिसरातील आयुक्तांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस पाणी पुरवठा विभागाचे युनिट कार्यालय आहे. याठिकाणी मोकळी जागा असल्याने मनपाच्या दवाखाना विभागातील भंगार साहित्य याठिकाणी ठेवलेले होते. दरम्यान, २१ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी हे भंगार साहित्य लंपास केले. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता सुनील तायडे यांनी बांधकाम शाखा अभियंता संजय दिनकर पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत पाहणी केली असता भंगार साहित्य चोरीस गेल्याचे त्यांना दिसू आले.
१८ हजारांचे भंगार लंपास
चोरट्यांनी मनपाच्या जागेवर ठेवलेले लोखंडी पलंग, खुर्च्या, लॉकर टेबल, डीलिव्हरी टेबल, चॅनल गेट, लोखंडी गेट यासह अनेक भंगार साहित्य लंपास केले. याप्रकरणी चोरट्यांनी याठिकाणाहून सुमारे १८ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.