कविवर्य विंदा करंदीकरांच्या साहित्याचा वेध घेणारा ‘स्वच्छंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:31 AM2018-08-12T00:31:31+5:302018-08-12T00:33:07+5:30

यंदाचे वर्ष हे कविवर्य विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम जळगाव येथील व.वा.वाचनालयातर्फे शनिवार, दि.१८ आॅगस्ट रोजी वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. विंदांच्या या कार्यक्रमाचा कवयित्री डॉ.अस्मिता गुरव यांनी ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये घेतलेला आढावा...

'Swayand', who is looking at the material of poetry, Vinda Karandikar | कविवर्य विंदा करंदीकरांच्या साहित्याचा वेध घेणारा ‘स्वच्छंद’

कविवर्य विंदा करंदीकरांच्या साहित्याचा वेध घेणारा ‘स्वच्छंद’

Next

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे....

चुकली दिशा तरीही... म्हणणारे कविवर्य विं.दा.करंदीकर यांनी कवितेची दिशा किती आणि कशी अचूक असावी याचे आपल्या समग्र साहित्यातून दर्शन घडवले. विंदांची कविता ही अनेक विषयांचा वेध घेणारी कविता. आशयघन कविता लिहिणाऱ्या या कविराजाने कवितेत वेगवेगळे प्रयोग केले आणि रसिकांना ते मनापासून आवडले... अर्वाचिनीकरण, तालचित्रे/स्वरचित्रे, मुक्त सुनीत, गझल आणि मुक्तछंद ही त्यातली काही उदाहरणे... शब्दांना अर्थाची खोली असते तेव्हा कविता मनाचा ठाव घेते. यावर विंदांचा दृढ विश्वास म्हणून त्यांनी कवितेतला अर्थ जपला, भाव जोपासला... शब्दांची जुळवा जुळव करण्याची ‘कारागिरी’ केली नाही तर मनाच्या तळातून आलेली कविता टिपली. ‘विरुपिका’ हा काव्यप्रकार विंदांनी कवितेत आणला आणि रसिकांना तो भावला. विंदांनी बालकविता लिहिली, सामाजिक प्रवृत्तीवर प्रहार करणारी ‘माझ्या मना बन दगड’ सारखी कविता लिहिली तशीच तत्त्वचिंतनात्मक ‘अष्टदर्शन’ सारखी कविता लिहिली. प्रकृती-पुरुष, विरह-मिलन बंधन-मुक्ती अशा वेगवेगळ्या संकल्पनांची उकल करणाºया राधा-कृष्णाच्या ऐहिक आणि आत्मिक सुखाच्या आंतरिक ओढीचा वेध घेणारी ‘मुक्ती मधले मोल हरवले’ ही कविता लिहिली. या कवितेत जगण्याच्या आणि जीवनमुक्तीच्या सर्व पातळींचे उत्कट दर्शन विंदांनी घडवले.
संत ज्ञानदेवांच्या ‘अमृतानुभवा’चे विंदांनी अर्वाचिन मराठीत रुपांतर केले असून ‘आकाशाचा अर्थ’, ‘आम्रयोग’, ‘स्पर्श पालवी’ हे त्यांचे ललितबंधही भावपूर्ण आहेत. विंदा जसे उत्तम कवी होते. तसेच ते मर्मज्ञ समीक्षक म्हणूनही ओळखले जात होते. तत्त्वचिंतनात्मक दृष्टी होती तशी खट्याळपणा ही त्यांची वृत्ती होती. त्यांनी पारंपरिक छंद आणि मुक्तछंद यातून ‘स्वच्छंद’ नावाचा नवा छंद आपल्या कवितेतून आणला आणि स्वच्छंदमय कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. युरोपातील आणि भारतातील आठ तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचे निरूपण करणाºया ओव्या त्यांनी लिहिल्या; त्यातही चार्वकाचे इहवादी तत्त्वज्ञान त्यांनी अत्यंत रसाळपणे मांडलय. विं.दा.करंदीकर या नावाच्या कवीने मराठी साहित्याला, रसिकांना भरभरून दिलं. करंदीकर-बापट-पाडगावकर या त्रिमूर्तीनी मराठी रसिकांना सुंदर गाणी, गझल आणि मुख्य म्हणजे कविता ऐकण्याचे संस्कार केले... गावोगावी कविताचे कार्यक्रम करून लोकांपर्यंत कविता पोहोचवण्याचं व्रत घेऊन कवितेचं देणं देऊन रसिकांना समृद्ध केलं.
अर्धीच रात्र वेडी, अर्धी पुरी शहाणी
भोळ्यासदाफुलीची ही रोजची कहाणी
आता न सांध्यतारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात गूढ गाणी

मग्रुर प्राक्तताचा मी फाडला नकाशा
विझेल तेथेच सारे मागचे इशारे
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

विंदांचं कविचा वाचन हे ज्यांनी त्यांच्या तोंडून गझल ऐकलीय, कविता ऐकलीय त्यांना तो आनंद काय होता ठावूकच आहे... विल्यम शेक्सपिअर तुकाराम महाराजांना भेटायला येतो. ही कविता विंदांच्या तोंडून ‘विल्या’ आणि ‘तुक्या’ या शब्दातून ऐकताना अक्षरश: तो प्रसंग साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. शब्द आणि स्वरावरची सादरीकरणाची ही हुकूमत विंदांकडे होती. ज्ञानपीठ सन्मान विजेत्या विंदांची कविता ही लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आनंद देणारी आहे. यंदाचे वर्ष हे कविवर्य विंदा करंदीकरांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ‘स्वच्छंद’ या डॉ.विद्याधर करंदीकर लिखित कार्यक्रमाचे येथील वल्लभदास वालजी वाचनालयातर्फे शनिवार दिनांक १८ आॅगस्ट रोजी वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा. संहिता डॉ.विद्याधर करंदीकर, निर्मिती संकल्पना, नेपथ्य वामन पंडित, संगीत माधव गावकर, सहभाग वामन पंडित, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, गौरी ताम्हणकर, माधव गावकर आणि रंगमंच बाळा आर्डेकर.
या कार्यक्रमात विंदांच्या समग्र साहित्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न असून आजवर या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अभिवाचनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे नेटके स्वरूप म्हणजे ‘स्वच्छंद....’ निवडक कविता, वेचक ललितबंध, विरूपिका, काव्य गायन अर्थात विंदाच्या साहित्याची सुरेख-सुरेल मैफल म्हणजे स्वच्छंद...!
- डॉ.अस्मिता गुरव, जळगाव

Web Title: 'Swayand', who is looking at the material of poetry, Vinda Karandikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.