अधिकृत ट्रेडमार्क नसणाऱ्या खाद्यतेल कंपनीचे गोडावून केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 10:20 PM2020-11-10T22:20:10+5:302020-11-10T22:26:24+5:30
लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : अधिकृत नोंदणी केलेला ट्रेडमार्क व रजिस्टर लेबलचा आर्टवर्क नसताना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या हिरापूर रोडस्थित खान्देश एक्स्ट्रक्शनमधील नारायणी ट्रेडिंग कंपनीच्या गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हर पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजता कारवाई केली. यात गोडावूनमधील पाच ते सहा लाख रुपये किंमतीचा माल सील करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, धुळे एमआयडीसीतील सोया ड्राॕप या खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीच्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्क आणि रजिस्टर लेबल आर्टवर्क सारखेच डिझाईन तयार करुन सोया अमृत नावाने खाद्यतेल विक्री केली जात आहे. एकसारखेच आर्टवर्क आणि रंगसंगीताचा सारखाच वापर करण्यात येत आहे. यावर संजय सोया ड्राॕप कंपनीचे डायरेक्टर संजय अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत मान्यता असलेल्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेकमार्क व लेबलचा आर्टवर्क सादर करुन मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली. याविरोधात कारवाईची मागणीही केली.
त्यानुसार न्यालयाने रिसिव्हर पथकाची नेमणूक करुन कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी दुपारी पथकाने गोडावून मध्ये जाऊन एक किलो वजनासह पाच व पंधरा किलो वजनाचे पाऊच, बॕरल व डबे असा एकुण पाच ते सहा लाखाचा माल सील केला आहे.
ऐन दिवाळीत खाद्यतेलाबाबत ही दुसरी कारवाई आहे. पाच रोजी अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव येथेच चार लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा मुद्देमाल जप्त केला. दिवाळीत खाद्यतेलाची मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे.
आमच्या खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीचा नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्कआहे. लेबलचे आर्टवर्क व डिझाईनही नोंदणीकृत आहे. याची नक्कल करुन चाळीसगावात खाद्यतेलाची विक्री होत आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई झाली आहे. यामुळे अनधिकृत ट्रेडमार्क व लेबलचा वापर करुन खाद्यतेल विक्री करणा-यांना चाप बसणार आहे.
-संजय अग्रवाल,
डायरेक्टर, सोया ड्रॉप कंपनी, धुळे
आम्ही सोया अमृत नावाने नोंदणी व रजिष्टर लेबल आर्टवर्क, डिझाईनसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. आमचे लेबल व डिझाईन वेगळे आहे. एकसारखे नाही.
-क्रिष्णकुमार माहेश्वरी,
चाळीसगाव