प्रियकरावर हल्ला होताना प्रेयसी बघतच राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:50 AM2020-06-05T11:50:44+5:302020-06-05T11:51:15+5:30
आरोपीला अटक : मेहरूण उद्यानात रात्रीचा थरार, घटनेनंतर आरोपी घरातच होता लपून
जळगाव : एक प्रियकर घरात असतानाच दुसरा प्रियकर धडकला, त्यामुळे आधी आलेल्याला पाहून दुसऱ्याच्या संतापाची नस मस्तकात गेली. ‘तुला बघतोच’ म्हणत त्याने दम भरुन घरातून पाय काढला. आधीच सुभाष व अंकुश या दोन्ही प्रियकरांमध्ये दरी निर्माण झाली होती. बुधवारी सायंकाळी अंकुश प्रेयसी वैशाली (काल्पनिक नाव) हिच्या घरी गेला असता तेथे आधीच सुभाष आलेला होता. त्याला पाहून अंकुश संतापात बाहेर निघाला. दुसरीकडे अंकुशला पाहून सुभाषचादेखील संताप झाला. तेथूनच घटनेला प्रारंभ झाला.
दरम्यान, प्रेयसीच्या घरात एकाचवेळी दोन्ही प्रियकर समोरासमोर आल्याने त्या रागातून सुभाष याने अंकुश याला रात्री फोन करुन मेहरुण उद्यानात ये, म्हणून सांगितले. दोघांचा मित्र असलेला अजीज हमीद तडवी हा रात्री १० वाजता अंकुशच्या घरी गेला. बबल्या घरी आहे का? म्हणून त्याने अंकुशच्या आईकडे विचारणा केली. इतक्या रात्री त्याच्याशी काय काम आहे? म्हणून आईने विचारणा केली. यावेळी त्याच्या हातात बॅट होती. घरातून बाहेर येत अंकुश याने मी पाच मिनिटात येतो, असे आईला सांगून अजिजसोबत दुचाकीवर बसून पुढे गेला. त्यावेळी सुभाषदेखील काही अंतरावर थांबलेला होता. दोघांच्या मागे सुभाष देखील निघाला.
मेहरुण उद्यानात स्मशानभूमीजवळ वडाच्या झाडाजवळ वैशालीशी असलेल्या प्रेमसंबंधावरुन दोघांमध्ये वाद झाला. काही कळण्याच्या आतच सुभाष याने अंकुशच्या छातीत शस्त्राने वार केले.
प्रेयसी वैशाली व सुभाष दोघांनी सोबत काढला पळ
पोलीस तपासात सुभाष याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर वैशालीदेखील काही अंतरावर होती. सुभाष अंकुशला मारणार असल्याची कुणकुण लागल्याने वैशाली त्याच्यामागे मेहरुण उद्यानात आली होती. त्यावेळी दुचाकीवरुन अंकुश व अजिज स्मशानभूमीजवळ आले. खड्ड्यात दुचाकी आदळल्याने अजिज बॅटसह खाली कोसळला. तेव्हा अंकुश याने बॅट हातात घेऊन समोरच थांबलेल्या सुभाष याला मारायला सुरुवात केली. त्यामुळे सुभाष याने खिशात ठेवलेले शस्त्र काढून अंकुश याच्या छातीवर वार केला. वैशाली हा थरार लांबून बघत होती, काय करावे व काय करु नये याबाबत तिला काहीच सुचत नव्हते, असेही सुभाष याने तपासात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी वैशाली हिलादेखील पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.
पोलिसांची मेहनत आली फळाला
-या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, एमआयडीसीचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अशोक सनकत, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, नीलेश पाटील, असीम तडवी व सचिन पाटील, संदीप पाटील, राजेंद्र कांडेकर, दीपक चौधरी, भूषण सोनार यांच्या पथकाने रात्री भर पावसात गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतली.
-जखमीला दवाखान्यात दाखल करणाºया अजिजला अशोक सनकत यांनी ओळखल्याने तपासाची दिशा मिळाली. त्यानंतर सुभाष याची माहिती काढली असता तो तांबापुरातील एका पार्टेशनच्या घरात बाहेरुन कुलुप लावून झोपल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तेथे जावून खात्री केली असता सुभाष आतमध्ये लपलेला होता. त्याला अटक केल्यानंतर त्यानेही गुन्ह्याची कबुली व कारण स्पष्ट केले. पहाटेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तपास पथकाचे कौतुक केले.