ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला; साखर महाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:02+5:302021-08-14T04:20:02+5:30
मागणी वाढली : केंद्र सरकारने कोटा केला कमी जळगाव : उपवास व विविध व्रत घेऊन आलेल्या श्रावण मासामध्ये साखरेला ...
मागणी वाढली : केंद्र सरकारने कोटा केला कमी
जळगाव : उपवास व विविध व्रत घेऊन आलेल्या श्रावण मासामध्ये साखरेला मागणी वाढू लागल्याने तिचे भावदेखील वाढत आहेत. मागणी वाढण्यासह ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने साखरेचा कोटा कमी केला आहे. त्यामुळेही भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या साखर दोन रुपये प्रति किलोने वाढून ती ३८ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर होती. तसे पाहता गेल्या अनेक दिवसांपासून किराणा साहित्यात फारशी मागणी नाही. त्यात आता साखरेला मागणी वाढू लागली आहे.
का वाढले भाव?
श्रावण मास सुरू झाल्याने रक्षाबंधन, गणेशोत्सव असे वेगवेगळे सण जवळ येत असल्याने साखरेला मागणी वाढू लागली आहे. सोबतच या महिन्यात साखरेचा कोटा कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाववाढ होत आहे.
- आनंद श्रीश्रीमाळ, व्यापारी
गेल्या अनेक महिन्यांपासून साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर होती. मात्र श्रावण महिना सुरू होताच काहीशी मागणी वाढली तसेच केंद्र सरकारच्याही धोरणाचा परिणाम होत आहे. त्यामुळे भाववाढ होत असल्याचा अंदाज आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
महिन्याचे बजेट वाढले
गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेल, डाळींचे भाव वाढत असल्याने बजेट कोलमडत आहे. त्यात आता साखरेचेही भाव वाढल्याने चिंता वाढली आहे.
- प्रमिला कासार, गृहिणी
एक तर कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात दररोज काटकसर करीत बचतीचा प्रयत्न करीत असताना कोणती ना कोणती वस्तू महाग होत आहे. आता साखरेच्या भाववाढीने बजेट वाढले आहे.
- स्वाती शेळके, गृहिणी
जिल्ह्याला दररोज लागते साखर (टनमध्ये) - ३०० टन
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी - ३६ रुपये
फेब्रुवारी - ३६ रुपये
मार्च - ३६ रुपये
एप्रिल - ३६ रुपये
मे - ३६ रुपये
जून - ३६ रुपये
जुलै - ३६ रुपये
ऑगस्ट - ३८ रुपये