शेततळ्यात साकारले तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:00 PM2020-01-18T22:00:28+5:302020-01-18T22:02:14+5:30
पाचोरा तालुक्यातील कुºहाड बुद्रूक येथील शेतकरी शांताराम नारायण काळे यांनी शेततळ्यात तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र साकारले आहे.
सुनील लोहार
कुºहाड, जि.जळगाव : पाचोरा तालुक्यातील कुºहाड बुद्रूक येथील शेतकरी शांताराम नारायण काळे यांनी शेततळ्यात तरंगते कुक्कूट व मत्स्यपालन केंद्र साकारले आहे. शेतीपुरक उद्योगाच्या माध्यमातून ते वर्षाकाठी दोन लाख रुपये नफा मिळवित आहेत.
शांताराम काळे यांनी त्यांच्या उमर्दे शिवारातील एक एकरवरील जमिनीवर दोनशे फूट लांबी व शंभर फूट रुंदीचे शेततळे तयार केले. यासाठी त्यांना पाच लाख रुपये खर्च आला. परंतु या शेततळ्यांचा नुसता शेतीसाठी पाण्याचा वापर न करता त्यांना त्यापासून अधिक उत्पन्न कसे मिळेल यासंदर्भात विचार सुरु केला. या शेततळ्यात त्यांनी देशी कोंबडी वाण व मत्स्य पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. त्यांनी या शेततळ्यात कुकुट पालनासाठी प्लॅस्टिक टाक्याच्या सहायाने तरंगते पत्राचे चारशे चौ. मी.चे शेड तयार केले. या शेडसाठी त्यांना पन्नास हजार रुपये खर्च आला. या शेडमध्ये देशी पाथर्डी नावाची कोंबड्यांची पिल्ले व सिमरन पोल्ट्री फीड नावाचे खाद्यपदार्थ टाकले. दोरी व प्लॅस्टिक टाक्यांच्या सहायाने हे शेड पूर्ण शेततळ्यात फिरत असते. ते या शेडमध्ये दर अडीच तीन महिन्यांनी तीनशे कोंबडीचे पिल्ले टाकतात. या दरम्यान त्यांना तीस हजार रुपये नफा मिळतो.
मत्स्य पालनासाठी शेततळ्यात या शेतकºयाने जून २०१९ मध्ये २० हजार मत्स्यबीज सोडले. वर्षाला सरासरी यातून दोन लाख रुपये नफा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या माशांच्या खाद्यासाठी या शेततळ्याच्या पाण्यावरील कोंबड्यांचे मलमूत्र तसेच मक्का भरडा, तांदूळ व शेंगदाणा तेलाचा खाद्य म्हणून वापर केला जातो.
शेतकऱ्यांनी सिंचनासाठी व दुष्काळापासून मुक्ती मिळविण्यासाठी शेततळे बनवून व दुय्यम उत्पादन मिळवण्यासाठी असा जोड व्यवसाय राबविला तर तो शेतकरी नक्कीच यशस्वी होईल व उत्पादनात वाढ होईल. या जोड व्यवसायाने शेततळ्याचे पैसे एकच वर्षात वसूल होतात.
- शांताराम काळे, कुºहाड बुद्रूक, ता.पाचोरा.