सुरांच्या झुल्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:07+5:302021-07-04T04:13:07+5:30

रात भी..नींद भी..कहानी भी.. हाय..क्या चीज है जवानी भी..! अशीच सगळी ती कहाणी होती. त्यातल्या त्यात जगजित सिंग आणि ...

On the swing of music ... | सुरांच्या झुल्यावर...

सुरांच्या झुल्यावर...

Next

रात भी..नींद भी..कहानी भी..

हाय..क्या चीज है जवानी भी..!

अशीच सगळी ती कहाणी होती. त्यातल्या त्यात जगजित सिंग आणि चित्रा सिंग या सुरेल जोडीच्या गझल ऐकणं म्हणजे तर माझ्यासाठी तरल धुक्याची मोहक वाटेवरून चालण्याची अनुभूती होती.

या वाटेवरची सगळीच वळणं देखणी होती. जीव ओवाळून टाकावा, असे शब्द आणि आयुष्यभर कानामनात साठवावे, असे सूर लाभलेली ही गझल होती.

शब्दांना प्राधान्य देणारी गायकी, भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर असलेल्या संगीतरचना, अत्यंत मोजक्या आणि कर्णमधुर अशा वाद्यांचा वापर आणि अर्थातच यासोबत विलक्षण भावपूर्ण सादरीकरण अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे जगजित सिंग यांची गझल मनात घर करून गेली होती. विशेषत: चित्रा सिंग यांच्यासोबतच्या त्यांच्या युगुलगीतांची केमिस्ट्री तर जीव की प्राण होती. एकीकडे चित्राजींचा धारदार आवाज काळीज कापत जाणारा, तर दुसरीकडे जगजितसिंग यांचा विलक्षण मुलायम - आश्वासक स्वर. प्राजक्ताची बरसात करणारा ठरायचा..!

सेनिया घराण्याची तालीम लाभलेल्या जगजित सिंग यांनी संगीतरचना करताना नेहमीच काव्याच्या दर्जाला प्राधान्य दिलं. शब्द इतके साधे आणि सोपे असावेत की, रसिकांच्या काळजाला सहज स्पर्शून जावेत आणि चाल मधुर तरीही अत्यंत सहज असावी, जी ओठांवर रुळावी. मैफलीतून परतताना रसिकांनी ती गुणगुणावी ! हे भान त्यांच्या प्रत्येक गझलेने जपलं.

"तुमको देखा तो यह खयाल आया..

जिन्दगी धूप तुम घना साया..."

यासारख्या अनेक गझलांनी जगजितसिंग यांना घराघरांत पोहोचवलं.

अनेक अल्बम, अनेक चित्रपटांना दिलेलं संगीत आणि अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रसिकांच्या काळजावर त्यांचं नाव कोरलेलं आहे. त्यांची एखादी गझल माझ्यासारख्या कितीतरी रसिकांच्या अवघ्या आयुष्याला पुरून उरत असणार.

कारण, आयुष्याची वाट कोणासाठीही साधी आणि सोपी नसते.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग येत असतात आणि अशा कठीण परिस्थितीत अनेकदा सोबतीला मात्र कोणीही नसतं.

एकान्ताने अंधारलेल्या एखाद्या रात्री, सुखदुःखांचे हिशेब केले जातात! काय मिळवलं.. काय गमावलं.. याचा पुन:पुन्हा आलेख मांडला जातो! रित्या ओंजळीकडे बघून निराशेच्या गर्तेत खोल बुडत जातात सगळ्या दिशा! आजूबाजूला नि:शब्द शांतता आणि मनात विचारांचा कोलाहल...!

अशा क्षणी कानांवर आलेले हे शब्द जणू जादू करतात.

दुनिया जिसे कहते हैं

जादू का खिलौना हैं

मिल जाए तो मिट्टी हैं

खो जाए तो सोना हैं

मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच काही अद्भुत रचनांचा जन्म होत असावा. अशी ही रचना! अंधारलेल्या वाटेत अचानक एक कवडसा दिसू लागतो. रितेपणाची जाणीव हळूहळू विरू लागते. हरवलेल्या स्वप्नांच्या वाटेवर पुन्हा एकदा चालण्याची आशा मनात रुजू लागते.

अच्छा सा कोई मौसम

तनहां सा कोई आलम

हर वक्त का रोना तो..

बेकार का रोना हैं..

आयुष्याचं गूढ तत्त्वज्ञान आता सहजतेने उलगडत जाते.

प्रत्येक क्षणाचा अर्थ शोधण्याच्या नादात आयुष्य संपण्याची वेळ केव्हा येते कळतच नाही. आलेला प्रत्येक क्षण जाणार आहे, याची जाणीव ठेवून तो मनसोक्त जगणं, हाच खरा आयुष्याचा अर्थ असतो, हे सत्य जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वच्छंदी जीवन जगू शकतो.

बरसात का बादल..

दिवाना है क्या जाने..

किस राह से बचना हैं..

किस छत को भिगोना हैं..

सुख आणि दुःख या भावना बऱ्याच प्रमाणात तत्कालिक असतात. काही वर्षांपूर्वी आपल्याला ज्या गोष्टीमुळे खूप आनंद होत असतो, तो आज होईलच असं नाही. म्हणूनच, केव्हा तरी असा क्षण नक्की यावा, जेव्हा सुख आणि दुःख या दोन्ही भावनांची तीव्रता कमी व्हावी. एक तटस्थता आयुष्यात निर्माण व्हावी.

‌‌ गम हो की खुशी दोनो..

कुछ दूर के साथी हैं..

फिर रस्ता ही रस्ता हैं..

हंसना हैं ना रोना हैं..

जगजितसिंग आणि चित्रासिंग या सुरेल जोडीने अजरामर केलेली ही गझल आहे निदा फाजली यांची.

कभी किसीको मुकम्मल

जहाँ नहीं मिलता

कहीं ज़मीं तो कहीं आसमां

नहीं मिलता..

असं विलक्षण लिहिणाऱ्या निदाजींबद्दल लिहिण्यासाठी शब्द आहेत कुठे माझ्याकडे?

डॉ. संगीता म्हसकर, जळगाव

Web Title: On the swing of music ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.