भुसावळातील काढा प्रकरणी डॉक्टरांवरही कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:24 AM2020-09-07T00:24:57+5:302020-09-07T00:26:54+5:30

युनानी काढ्याच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करीत दोन मशनरीसह एक लाख दोन हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

Sword of action against doctors in Bhusawal case | भुसावळातील काढा प्रकरणी डॉक्टरांवरही कारवाईची टांगती तलवार

भुसावळातील काढा प्रकरणी डॉक्टरांवरही कारवाईची टांगती तलवार

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेशयुनानी काढ्याच्या कारवाईनंतर आदेशाकडे नागरिकांचे लक्ष

उत्तम काळे
भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्गावरील अयान कॉलनीमधील एम.आय.तेली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या युनानी काढ्याच्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करीत दोन मशनरीसह एक लाख दोन हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपचे नगरपालिकेतील गटनेते मुन्ना इब्राहिम तेली यांच्यासह इतरांवर काय कारवाई करण्यात येते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, या कारखान्यात एका मोठ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. औषध प्रशासन विभागाने सात दिवसात अहवाल देणार असल्याचे कालच पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे अहवाल काय येतो व कारवाई कुणावर होते, याकडे शहराचे नव्हे तर राज्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
कोरोना आजारावर उपयुक्त ठरत असल्याचा दावा करणाºया युनानी काढ्याच्या युनिटवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
५० ग्रॅमचे पाकीट
कोरोनाच्या उपचारात रोगप्रतिकारक शक्ती हा महत्वाचा घटक आहे. मालेगाव येथील काढा कोरोनाच्या काळात उपयुक्त व गुणकारी ठरल्याने प्रसिध्द झालेला आहे.
या अनुषंगाने भुसावळातील भाजपचे गटनेते हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांनी डॉ.रफीक अहमद व डॉ.जाकीर पिंजारी यांच्या मदतीने भुसावळातही या काढ्याची निर्मिती सुरू केली होती. यात नऊ युनानी घटकांचा समावेश असून, यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा करण्यात आला होता. कोरोनाचे संकट टळावे यासाठी अल्पावधीत हा काढा प्रसिद्ध झाला होता. गुजरातमधून सुमारे तीन लाख पाकिटांची आॅर्डर देण्यात आली असल्याचे वृत्त आहे . एका पाकिटात ५० ग्राम काढा भरण्यात येत होता. त्याची किंमत ३० रुपये ठेवण्यात आली होती.
ना नफा ना तोटा तत्त्वावर विक्री
एकंदरीत, सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे या काढ्याची विक्री करण्यात येत होती. आम्ही केवळ समाजसेवेसाठी काढा विकत असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत असला, तरी यातून लाखो रुपयांची कमाई झाल्याचे दिसते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग संबंधितांवर काय कारवाई करते व अहवाल काय देते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
मुन्ना तेली यांनी आपण ना नफा-ना तोटा या तत्वावर हे उत्पादन उपलब्ध करून देत असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. महाराष्ट्रासह एम.पी. व गुजरातमध्ये याची लोकप्रियता वाढीस लागली होती. या पाशर््वभूमीवर ५ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हा काढा तयार करणाºया युनिटवर धुळे येथील निरीक्षक तथा जळगावचे प्रभारी सहाय्यक आयुक्त श्याम नारायण साळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक ए.एम.माणिकराव, अन्न सुरक्षा अधिकारी साळुंके यांच्या पथकाने छापा टाकून काढा व काढा बनवणारी सामग्री जप्त केली आहे.

Web Title: Sword of action against doctors in Bhusawal case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.