नशिराबादकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:32+5:302021-02-20T04:43:32+5:30

नशिराबाद: वर्षानुवर्षांपासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. १६ कोटींची पाणी योजनाही शापितच ठरली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पातळी ...

Sword of water scarcity hanging over Nasirabadkars! | नशिराबादकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार!

नशिराबादकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार!

Next

नशिराबाद: वर्षानुवर्षांपासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. १६ कोटींची पाणी योजनाही शापितच ठरली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पातळी खोलवर गेल्याने पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

भूगर्भातील जल पातळी खोलवर जाणे, पुरेशी यंत्रणा नसणे याबाबी कायमच असतात. त्यामुळे येथे ६ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. वेळप्रसंगी महिन्यातून तीन ते चार वेळेस पाणी मिळते. ग्रामपंचायतने शुद्ध पाण्यासाठी आरो प्रणाली योजना सुरू केली. त्यामुळे ग्रामस्थांना अल्प दरात शुद्ध पाणी मिळू लागले. पण त्याचेही थकीत वीज बिल न भरल्यामुळे शुद्ध पाणीही मिळणे बंद झाले. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण आहेच. सहा ते सात दिवसांपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. शुद्ध पाणीपुरवठा करणारे आरओ प्रणाली केंद्रही थकबाकीमुळे वीज खंडित केल्याने बंद आहे. पाणीटंचाईचे ग्रहण आता संपणार तरी कधी? मे महिन्यात पाणी मिळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुमारे ५० हजार लोकसंख्येचे तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून नशिराबादची ओळख आहे. मात्र येथे अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. बेळी वाघूर, मुर्दापूर धरणासह गावातील स्थानिक जलस्त्रोतातून गावकऱ्यांची तहान भागविण्यात येते. वर्षानुवर्षापासून होत असलेल्या या टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. त्यावर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजना करण्यात आली. शेळगाव बॅरेज येथून पाणी नशिराबादला आणून शुद्धीकरण करीत गावाला पुरवठा करण्याची योजना आहे. नियमित शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा गावाला होईल, असा गाजावाजा करीत मोठ्या थाटात योजना कार्यान्वित करण्यात आली. योजना कार्यान्वित झाल्यापासून अनेक अडचणी, विघ्नांचा सामना करीत गावाला पाणी मिळाले. मात्र योजनेचा काही महिन्यातच फज्जा उडाला.त्यामुळे योजना अपयशी ठरली आहे.

वाघूर बेळी मुर्दापूर धरण केंद्राजवळील जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात खोलवर गेला आहे.त्यातच मुर्दापूर धरणाजवळील जलस्त्रोताची भूजल पातळी खोल गेल्याने पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातच शेळगाव बॅरेज इथून होणारा पाणीपुरवठा जलपातळी खोलवर गेल्याने टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सद्या सहा ते सात दिवसांनी पाणी मिळत आहे आणि टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी वाघूरचे आवर्तन सोडण्यात येते.

आता पाण्याचे खापर कुणाच्या डोक्यावर?

आतापर्यंत मजीप्रा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजनेचा चालवत होती. त्यावेळी अनेकदा अडचणी येऊन शुद्ध पाणीपुरवठा झालाच नाही त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्यात येणाऱ्या विघ्नांचे खापर मजीप्रावर फोडले. नियोजनाचा अभाव व अपूर्ण यंत्रणेमुळे पाणी समस्या कायमच राहिली मात्र आता ग्रामपंचायतच्या हातात योजना आली आहे. तरीही शुद्ध पाणीपुरवठा गावकऱ्यांना का मिळत नाही असा उपहासात्मक प्रश्न आता गावात चर्चिला जात आहे. आता पाणी खापर कोणाच्या डोक्यावर? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विकतचे पाणी...

टंचाईमुळे पाण्यासाठी हाल होत आहे अनेक जण जारचे विकतचे पाणी घेताना दिसत आहे. सुमारे २० ते ३० रुपयांपर्यंत मिळत आहे. पाणी जारला वाढती मागणी आहे

आरो केंद्र बंद...वीज कापली

ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायतीने पाच रुपयांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातही ग्रामपंचायतीच्या आरो प्रणाली केंद्राची वीज बिले थकल्यामुळे गावातील आरो प्रणाली केंद्र बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थांना अल्पदरात मिळणारे शुद्ध पाणीसुद्धा पुरवण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. सुमारे १५ लाखांच्या घरात वीज थकबाकी बिल आहे.

भाग्य उजळणार कधी....

प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन देऊन मतांचा जोगवा मागण्यात येतो. निवडून आल्यावर आश्वासन विसरले जाते. पाणीटंचाई आणि नशिराबाद हे समीकरण बदलणार केव्हा? पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तत्काळ उपाययोजना व्हावी. अनेकदा पाणी समस्येबाबत आश्वासने मिळाली. मात्र आजपर्यंत टंचाई कायम आहे. मतांचा जोगवा मागणाऱ्यांनो पाणी..... द्या अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहे. आतातरी नशिराबादकरांचे भाग्य उजळणार का? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

Web Title: Sword of water scarcity hanging over Nasirabadkars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.