रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फासले शेण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:27+5:302020-12-13T04:31:27+5:30
जळगाव : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या ...
जळगाव : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी जळगाव महापालिका इमारतीसमोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण फासून संताप व्यक्त केला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला कार्यकर्त्या शोभा चौधरी, सरिता माळी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनात शेतकरी नसून दुसरेच लोक असल्याचे सांगत पाकिस्तान आणि चीनकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात असल्याचे वक्तव्य केले होते.
प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या
आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या भरवल्या. त्याचप्रमाणे सर्व आंदोलकांनी दानवे यांच्या पुतळ्याला शेण भरवून त्यांना आता तरी अक्कल येईल, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपचे मंत्री नेहमी प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
इंधन दरवाढ मागे घ्या
या आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.