‘टी’ आकाराच्या पुलाला विद्युत खांबामुळे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:36+5:302020-12-22T04:15:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, कामाचा वेग संथगतीने ...

T-shaped bridge breaks due to electric pole | ‘टी’ आकाराच्या पुलाला विद्युत खांबामुळे ‘ब्रेक’

‘टी’ आकाराच्या पुलाला विद्युत खांबामुळे ‘ब्रेक’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, कामाचा वेग संथगतीने आहे. मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने ‘टी’ आकाराचा पूल मंजूर असताना ‘टी’ आकाराला स्थगिती देऊन ‘एल’ आकाराच्याच पुलाचे काम सुरू केले आहे. ‘टी’ आकारासाठी विद्युत खांब अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम महावितरण करेल की मनपा यामध्येच ते अडकले आहे. या फेऱ्यात अडकले तर उड्डाणपूल मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याने ‘टी’ आकाराच्या पुलाला स्थगिती देण्यात आली असून, विद्युत खांबाचा अडथळा दूर झाल्यानंतरच ‘टी’ आकाराचा विचार होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम सुरू असताना पुलालगत व खालच्या बाजूला असलेले महावितरणचे विद्युत खांब हटविले गेले नसल्याने काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पुढील कामाला या खांबामुळे अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम जोपर्यंत लांबणार, तोपर्यंत पुलाचे कामही लांबत जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च इतकी आहे. त्यामुळे आता महावितरणची वाट न पाहता बांधकाम विभागने ‘एल’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्वीप्रमाणेच पूल तयार झाला तर त्यावरून वाहतूक सुरू होऊ शकते. त्यानंतर विद्युत खांब काढण्यात आले तर पुढे शिवाजीनगर भागातील अमर चौकपर्यंत आर्म काढता येऊ शकतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

१. फेब्रुवारी २०१९ पासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, मार्च २०२१ पर्यंत या कामाची मुदत आहे. मात्र, आतापर्यंत या पुलाचे काम ६० टक्के इतके झाले असून, पुलादरम्यान येणाऱ्या विद्युत खांबामुळे अनेकवेळा हे काम थांबले आहे. तसेच अनेकवेळा कामाला अडथळा निर्माण होत असतो.

२. विद्युत खांब काढण्यासाठीची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली आहे. मात्र, खांब काढण्यासाठी महावितरणकडे निधी नसल्याने हे काम होऊ शकलेले नाही. हा पूल मनपाच्या हद्दीत असल्याने या कामासाठी मनपानेदेखील निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मनपाकडेदेखील अद्याप निधीबाबत कोणतेही उत्तर आलेले नाही.

३. दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, महावितरण व रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. कामाला लागणारा खर्च याबाबतचा अंदाजपत्रक तयार करून, राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडे दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव दोन आठवड्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडलेला आहे.

‘एल’ आकाराला स्थानिकांची अडचण नाही

पूर्वीप्रमाणे होत असलेल्या पुलाला स्थानिकांची कोणतीही अडचण नसून, ‘टी’ आकाराला स्थानिकांचा विरोध होता. ‘एल’ आकारातील पूल तयार झाला तर या भागातील नागरिकांना कानळदा रस्त्याकडून पुलाचा वापर करता येणार आहे. मात्र, या भागातील इतर नागरिकांच्या सोयीसाठी ब्राह्मणसभेकडून बोगदा तयार करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांची आहे. याबाबत रेल्वेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिवाजीनगरातील नागरिकांनी दिली.

Web Title: T-shaped bridge breaks due to electric pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.