शानभाग विद्यालयाचे उपमुख्याध्यापक व वर्गशिक्षकावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:13+5:302021-06-04T04:13:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानभाग विद्यालयाने फीअभावी विद्यार्थ्याचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शानभाग ...

Take action against the deputy headmaster and class teacher of Shanbhag Vidyalaya | शानभाग विद्यालयाचे उपमुख्याध्यापक व वर्गशिक्षकावर कारवाई करा

शानभाग विद्यालयाचे उपमुख्याध्यापक व वर्गशिक्षकावर कारवाई करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानभाग विद्यालयाने फीअभावी विद्यार्थ्याचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शानभाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या स्तरावर उपमुख्याध्यापक जयंत टेंबरे आणि वर्ग शिक्षक हर्षल सुधाकर घोलाने यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोघांवर काय कारवाई केली, याचा अहवाल उलट टपाली कार्यालयास सादर करण्याचे देखील आदेशात म्हटले आहे.

शानभाग विद्यालयाने ऑफलाइन निकाल जाहीर करून काही विद्यार्थ्यांना निकालपत्र वाटप केले होते. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे, त्यांचे निकाल विद्यालयाने रोखून ठेवले असल्याची तक्रार एका विद्याथ्याचे पालक तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रार झाल्यानंतर शानभाग विद्यालयाने आपला खुलासा सादर केला होता. तर खुलाशाविरुद्ध शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे म्हणणे सादर केले होते. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी याप्रकरणी शाळेतील विविध लोकांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन दोषी आढळून आले होते. तसा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांना पाठविण्यात आला होता.

शानभाग विद्यालयास सक्त ताकीद

अहवाल प्राप्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शानभाग विद्यालयाच्या संचालक मंडळाला पत्र पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले की, आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा निकाल फीसाठी राखून ठेवला व उशिराने संबंधित तक्रारदारास व्हॉटस्ॲपद्वारे निकाल दिला आहे. तरी सदर चौकशीअंती शालेय प्रशासन दोषी असल्याचे स्वयंस्पष्ट अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तरी याबाबत सक्त ताकीद देण्यात येत आहे. यापुढे भविष्यात अशी बाब पुन्हा घडणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

उपसंचालकांना पाठविले पत्र

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी नाशिक उपसंचालक यांच्याकडे देखील पत्र पाठविले आहे. तसेच शाळा दोषी आढळून आली असून तिला सक्त ताकीद देण्‍यात आली असल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Take action against the deputy headmaster and class teacher of Shanbhag Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.