त्या पोलिसावर कारवाई करा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 07:35 PM2021-01-02T19:35:37+5:302021-01-02T19:35:48+5:30
निवेदन : फळ विक्रेता महिलेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फळ विक्रीचा व्यवसाय करू देण्यासाठी हप्ता मागणा-या शहर पोलीस ठाण्यातील ह्यत्याह्ण पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅन्थर संघटना व फळ विक्रेती महिला कल्पनाबाई जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंधरा दिवसात कुठलीही कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
फुले मार्केट परिसरात कल्पनाबाई या फळ विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक पोलीस कर्मचारी व्यवसाय करण्यासाठी हप्ता मागत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच फळ विक्रेता महिलेचे कुटूंब तिच्यावर अबलंबून आहे. मात्र, खोटे गुन्हे दाखल करून महिलेला व्यवसाय करून दिला जात नाही. त्यामुळे त्या पोलीस कर्मचारीवर निलंबणाची कारवाई करण्यात यावी अन्यथा बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली हिरोळे, जिल्हाध्यक्ष राजू महाले यांच्या स्वाक्ष-या आहेत.