उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!
By अमित महाबळ | Published: October 12, 2023 08:13 PM2023-10-12T20:13:35+5:302023-10-12T20:13:50+5:30
विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली.
जळगाव : विधी शाखेच्या विद्यापीठाकडून होणाऱ्या प्रत्येक सत्राच्या परीक्षेआधी महाविद्यालयांनी प्राथमिक पूर्व परीक्षा (प्रिलीम) घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयात तासिकांना उपस्थिती बंधनकारक करावी असे निर्देश कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले. प्राध्यापकांनी मूल्यांकन गांभीर्याने करावे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली.
परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामकाज सुरुळीत व्हावे, तसेच कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी, विधी शाखेशी निगडीत प्राचार्य, शिक्षक प्रतिनिधी आणि विधी महाविद्यालयांचे व्यवस्थापन प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीस कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माजी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.व्ही.वाय.बहिरम, प्राचार्य डॉ.युवाकुमार रेड्डी, संस्थाचालकांचे प्रतिनिधी ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी, डॉ. व्ही. एच. पाटील, डॉ. एन. डी. चौधरी, डॉ. आर. एन. मकासरे, डॉ. विजेता सिंग, डॉ. साजेदा शेख, एस. जी. गाडगे, डॉ. किर्ती पाटील, प्रा. विद्या पाटील, मिलिंद कुलकर्णी, के. सी. पाटील, वसंत वळवी आदी उपस्थित होते.
गुणवत्तेशी तडजोड करू नका
प्रा. योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा.दीपक दलाल यांनी केले. समारोपप्रसंगी कुलगुरुंनी गुणवत्तेशी तडजोड न करता शिक्षकांनी सामूहिक जबाबदारीची भावना बाळगून काम करावे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयांना सूचना
- विद्यापीठाच्या परीक्षा होण्याआधी प्रत्येक सत्रात महाविद्यालयांनी प्रिलीम परीक्षा घ्यावी.
- सोडवलेली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून ती कशी सोडवली व कशी सोडविणे अपेक्षित आहे याची माहिती द्या
- तासिकांना पूर्ण वेळ उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करावे.
- विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदवही महाविद्यालयांनी ठेवावी
निकाल बदलताहेत, विद्यापीठाची प्रतिमा जपा
गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विधी शाखेचे विद्यार्थी निकालाबाबत तक्रारी करीत आहेत. रिड्रेसलमध्ये त्यांच्या निकालात फरक पडत आहे. त्यामुळे या बैठकीत प्राध्यापकांनी मूल्यांकन गांभीर्याने करावे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, विद्यापीठाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच रिड्रेसल, फोटोकॉपी या विषयीचे नियम आणि विद्यापीठाचे कामकाज याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना द्यावी, असे आवाहन कुलगुरुंनी या बैठकीत केले.