खाजगी डॉक्टरांनी उपचार केलेल्या कोरोना लक्षणाच्या रुग्णांचे तत्काळ स्वॅब घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:29 PM2020-08-06T13:29:02+5:302020-08-06T13:29:02+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचेही निर्देश, तालुकास्तरावर पथके
जळगाव : रुग्णांना काही त्रास होत असल्यास ते खाजगी डॉक्टरांकडे जात असून इतर उपचारातच वेळ जाऊन रुग्ण उशिराने कोरोना उपचारासाठी पोहचत असल्याने मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तत्काळ आयसीएमआरच्या निर्देशानुसार कोरोनाचे उपचार सुरू करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण समोर येण्यासाठी गेल्या आठ दिवसात खाजगी डॉक्टरांनी उपचार केलेल्या व लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांची तत्काळ तपासणी करा, असेही आदेशात म्हटले आहे. सोबतच तालुका पातळीवर बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकाºयांना दिले आहे.
कोरोनाच्या उपाययोजनांतर्गत जिल्हाधिकारी राऊत यांनी कोरोना उपचार व मृत्यू रोखण्यासाठी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बाधित रुग्ण उशिराने दाखल होत असल्याचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे जिल्ह्याचे प्रमाण ४.५ टक्के असून हे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. या सर्वांमध्ये रुग्ण उशिरा येणे व मृत्यू होणे याची कारणे शोधले असता रुग्ण हे प्रथम जनरल प्रॅक्टीशनरकडे जात असून तेथे त्यांच्यावर तापासह इतर उपचार करण्यातच वेळ जातो व अत्यवस्थ झाल्यानंतर ते कोरोना उपचारासाठी दाखल होत असल्याचे समोर आल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे याला आळा बसण्यासाठी प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, खाजगी डॉक्टरांकडून अशा प्रकारे उपचार होणे गंभीर असून त्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांची लगेच अंमलबजावणी होण्यासाठी ज्या खाजगी डॉक्टरांकडे लक्षणे असलेल्या रुग्णांनी उपचार घेतले आहे, त्यांची यादी प्राप्त करून त्यांचे स्वॅब घ्यावे.
पदवी नसलेले डॉक्टही करु लागले उपचार
एकीकडे खाजगी डॉक्टरांकडे जाऊन वेळ जात असल्याने रुग्ण अत्यवस्थ होत असताना ग्रामीण भागात ज्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवी नाही, असे डॉक्टरही उपचार करीत असल्याने अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत. याच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावरच तपासणी करण्यासाठी पथक तयार करावे पथकाने केलेल्या कारवाईचा आढावा उपविभागीय अधिकाºयांनी घ्यावे, असेही स्पष्ट केले आहे.
वेळेत निदान न होता मृत्यू झाल्यास प्रशासकीय आॅडीट
एखादा कोरोना बाधित रुग्ण खाजगी डॉक्टर्सकडे उपचार घेत असेल व या रुग्णाचे वेळेत निदान न झाल्यास अथवा उशिरा रुग्णालयामध्ये दाखल झाल्यामुळे मृत्यू झाल्यास त्याचे प्रशासकीय आॅडीट, डेथ आॅडीट करण्यात येणार असून त्यामध्ये निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित डॉक्टर कारवाईस पात्र राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
खाजगी डॉक्टरांसंदर्भात अशा आहेत सूचना
- रुग्णामध्ये ताप, घशात खवखव, श्वसनाचा त्रास, सर्दी, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, उलटी, अतिसार, खोकल्यातून रक्त यासारखी कोरोनाचे लक्षणे दिसत असलेल्यास कोरोना संशयित म्हणून आयसीएमआरच्या निर्देशानुसार त्वरीत उपचार सुरू करावेत
- अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठवावे. स्वॅब घेतला आहे की नाही, याचा डॉक्टरांनी पाठपुरावा करावा
- रुग्ण पाठवूनही स्वॅब न घेतल्यास उपविभागीय अधिकाºयांशी संपर्क साधावा
- खाजगी डॉक्टरांनी पाठविलेल्या रुग्णांची माहिती व झालेली कारवाई उपविभागीय अधिकाºयांनी प्राप्त करण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा
- संशयित कोरोना रुग्णांची माहिती खाजगी डॉक्टरांनी गुगल फॉर्मवर भरणे बंधनकारक राहणार
- उपचार चुकत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यावे
- दररोजचा आढावा संध्याकाळी घेण्यात येणार
-उल्लंघन झाल्यास डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार