म्युकरमायकोसिसने घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:58+5:302021-06-10T04:12:58+5:30
एरंडोलच्या शेतकऱ्याचा बळी एरंडोल : म्युकरमायकोसिसने एरंडोल तालुक्यातील एका शेतकऱ्याचा बळी घेतला. यामुळे तालुक्यातील बळींची संख्या आता दोन ...
एरंडोलच्या शेतकऱ्याचा बळी
एरंडोल : म्युकरमायकोसिसने एरंडोल तालुक्यातील एका शेतकऱ्याचा बळी घेतला. यामुळे तालुक्यातील बळींची संख्या आता दोन झाली आहे. या वृत्तास आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
गजानन खंडू पाटील (४३, रा. नांदखुर्द बुद्रुक, ता.एरंडोल) असे या म्युकरमायकोसिसचा बळी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ६ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. गजानन पाटील यांना २१ एप्रिल रोजी जळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २१ एप्रिल ते ६ मेपर्यंत पाटील हे कोरोनाबाधित होते.
७ मे रोजी म्युकरमायकोसिसचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. महिनाभरापासून उपचार घेत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, एरंडोलसह तालुक्यात म्युकरमायकोसिसचे २० ते ३० रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळू येथील डॉ. नरसिंग पाटील यांचाही १५ दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला होता.