चहावाल्याकडून चावी घेऊन 15 हजार रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:42 AM2017-03-15T00:42:16+5:302017-03-15T00:42:16+5:30
न्यू.बी.जे.मार्केटमध्ये चोरी : नोकरावर संशय
जळगाव : चहावाल्याकडे ठेवलेली चावी घेऊन संशयिताने दुकानातील कॅश कांउटरचे कुलूप तोडून त्यातील 15 हजाराची रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी न्यू बी.जे.मार्केटमधील अॅल्युवल्र्ड अॅल्युमिनीयम सेक्शन अॅण्ड ग्लास या दुकानात घडली. दुकानातील नोकराने हा प्रताप केल्याचा संशय आहे.
विजय बोरसे यांच्या मालकीचे न्यू बी.जे.मार्केटमध्ये 303/अ बेसमेंटला दुकान आहे. याच मार्केटमध्ये अन्य दुकानाचा ते गोडावून म्हणून वापर करतात. नेहमी रात्री दुकान बंद केल्यावर दुकानाची एक किल्ली मार्केटमधील चहावाले अप्पा यांच्याकडे ठेवतात. मंगळवारी सकाळी शफीक शेख हा कर्मचारी दुकानावर आला असता त्याला दुकानाचे कुलूप उघडे दिसले. त्याने तत्काळ ही माहिती दुकान मालक विजय बोरसे यांना कळवली.
कटरच्या साहाय्याने लॉक तोडले
संशयित चोरटय़ाने हॅँडकटरच्या साहाय्याने लॉक तोडले आहे. त्यातील अंदाजे 15 हजाराची रोकड घेऊन संशयित पसार झाला. जाताना त्याने दुकानाचे शटर खाली टाकले. गेल्या सात आठ महिन्यांपासून बोरसे यांच्याकडे कारागीर म्हणून असलेल्या तरुणानेच ही चोरी केली असल्याची शक्यता आहे.
कारण सर्वात आधी त्यानेच चहावाल्याकडून किल्ली घेतली होती. दुकानातील कारागीर असल्याने त्याला किल्ली देण्यात आली. संशयिताने अन्य कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही.
सव्वा लाखाची रक्कम सुरक्षित
संशयिताने गल्लय़ातील 15 हजाराची रोकड व चिल्लर लांबविली असली तरी त्याच गल्लय़ात शेवटी असलेली सव्वा लाख रुपयांची रोकड मात्र सुरक्षित राहिली आहे. गल्लय़ात पुढेच असलेल्या शंभराच्या नोटा व काही चिल्लर चोरटय़ाने लांबविली आहे. दुकानातून काही वस्तू गेल्या आहेत का? याची तपासणी करीत असताना गल्ल्यात ही रक्कम आढळून आली.