गर्दीच्या फायदा घेत चोरट्यांनी लांबविली दोन महिल्यांच्या सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:43+5:302020-12-30T04:20:43+5:30
जळगाव : गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल-विदगाव एसटीत चढणाऱ्या रेखा धनंजय महाजन (रा.दहीगाव, ता. यावल) व प्रतिभा जयप्रकाश ...
जळगाव : गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल-विदगाव एसटीत चढणाऱ्या रेखा धनंजय महाजन (रा.दहीगाव, ता. यावल) व प्रतिभा जयप्रकाश चौधरी (रा. डांभुर्णी, ता.यावल) या प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळपोत लांबविली. ही घटना जळगाव नवीन बसस्थानकावर सोमवारी, दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दहिगाव येथील रेखा महाजन व त्यांचे पती धनंजय महाजन हे २६ डिसेंबर रोजी नाशिक येथील घराच्या पूजेसाठी गेले होते. घराची पूजा आटोपून महाजन दाम्पत्य सोमवारी सकाळी ६ वाजता जळगावसाठी नाशिकहून निघाले. नंतर दुपारी १२ वाजता जळगाव नवीन बसस्थानकावर पोहोचले. दहिगाव जाण्यासाठी महाजन दाम्पत्य बसमध्ये चढले. त्यानंतर सीटवर जाऊन बसताच, रेखा महाजन यांच्या गळ्यातील पोत तुटून पडली. त्यावेळी दहा हजार रुपये किमतीची पोत व दोन सोन्याच्या वाट्या कुणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आणखी एका महिलेची पोत तोडली...
बसमधील प्रतिभा जयप्रकाश चौधरी या प्रवासी महिलेने सुद्धा तिची पोत कुणीतरी तोडल्याचे सांगितले. दोन्ही प्रवाशांनी पोत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाली.
प्रवासी महिलांनी गाठले पोलीस ठाणे
महाजन व चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. नंतर पोलिसांना सर्व हकिकत सांगितले. त्यानंतर रेखा महाजन यांचे दहा हजार रुपये किमतीची पोत व वाटी तसेच प्रतिभा चौधरी यांचे २० हजार रुपयांची सोन्याची पोत चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.