तापात ही गोळी घेणे ठरेल ‘खतरनाक’; आरोग्य अधिकाऱ्यांचा मोलाचा सल्ला

By अमित महाबळ | Published: September 16, 2023 06:03 PM2023-09-16T18:03:18+5:302023-09-16T18:03:45+5:30

आजाराचे वेळीच निदान आणि उपचार याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Taking this pill in fever would be 'dangerous'; Valuable advice from health authorities | तापात ही गोळी घेणे ठरेल ‘खतरनाक’; आरोग्य अधिकाऱ्यांचा मोलाचा सल्ला

तापात ही गोळी घेणे ठरेल ‘खतरनाक’; आरोग्य अधिकाऱ्यांचा मोलाचा सल्ला

googlenewsNext

अमित महाबळ

जळगाव : पाऊस म्हटला म्हणजे डेंग्यूचे रुग्ण आढळू लागतात. हे दरवर्षी घडत असले, तरी या आजाराला हलक्यात घेण्याची चूक कधीही करू नका. रुग्णावरील उपचारात विलंब झाला अथवा चुकीचा औषधोपचार झाल्यास प्रसंगी रुग्ण दगावू शकतो, असा इशारा जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिला आहे. आजाराचे वेळीच निदान आणि उपचार याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात दोन दिवसांपूर्वी १९ वर्षीय तरुणाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य पथकांनी डासअळी व तापाचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. डॉ. सचिन भायेकर म्हणाले की, डेंग्यू फिव्हर असलेल्या रुग्णाला सहसा रुग्णालयात भरती करण्याची गरज नसते. मात्र, डेंग्यू शॉक सिंड्रोम (डेंग्यू संबंधित लक्षणांचा समूह) असेल तर रुग्णालयात भरती होण्याशिवाय पर्याय नसतो. रक्तस्रावयुक्त डेंग्यू हा आणखी एक गंभीर प्रकार आहे.

डेंग्यू फिव्हरपासून सुरुवात
या आजाराची सुरुवात डेंग्यू फिव्हरपासून होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा वेळीच योग्य औषधोपचार मिळाले नाहीत तर डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा रक्तस्रावयुक्त डेंग्यू होऊ शकतो. रक्तस्रावयुक्त डेंग्यू प्रकारात रुग्णाच्या शरीराला बारीक चिमटा काढला, तरी रक्तस्राव सुरू होतो. जिल्ह्यात या प्रकारातील रुग्ण आजपर्यंत आढळून आलेला नाही.

शिरसोलीत काय घडले ?
शिरसोलीमधील १९ वर्षीय रुग्ण डेंग्यू शॉक सिंड्रोम या प्रकारात गेला होता. दि. ८ सप्टेंबरला त्याला ताप आला. त्यानंतर डेंग्यूचे निदान होण्यासाठी एनएसवन रॅपिड टेस्ट करण्यात आली. औषधोपचार देण्यात आले. या दरम्यान तीन रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. परंतु, दि. १४ रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला.

ही गोळी टाळा...
ताप आलेला असताना डॉक्टर उपलब्ध नसेल तर प्लेन पॅरासिटेमॉल गोळी घेऊ शकता. मात्र, त्यापासून दुष्परिणामांचा रुग्णाचा इतिहास नाही हेही माहीत असू द्या. तापात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ॲस्परिन हे औषध घेऊ नका. ते रक्त पातळ करण्याचे काम करते. त्यामुळे धोका वाढतो. शक्य तेवढ्या लवकर वैद्यकीय तपासणी, तसेच शंका असल्यास डेंग्यू संशयित म्हणून लॅबमधून चाचणी करून घ्यावी, असेही डॉ. सचिन भायेकर यांनी सांगितले.

Web Title: Taking this pill in fever would be 'dangerous'; Valuable advice from health authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.