चोपडा येथे तलाठ्यास लाकडी दांडक्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:16+5:302021-09-27T04:19:16+5:30
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार अनिल गावीत यांच्या आदेशाने शहर तलाठी ए.बी. सोनवणे, देवगाव तलाठी भूषण विलास पाटील, वडगाव ...
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार अनिल गावीत यांच्या आदेशाने शहर तलाठी ए.बी. सोनवणे, देवगाव तलाठी भूषण विलास पाटील, वडगाव बुद्रूकचे तलाठी आशिष कडूबा काकडे व निमगव्हाणचे तलाठी कल्पेश वकील कुंवर हे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील पंकज नगरमध्ये गस्त घालत होते. त्याचवेळी बोरोले नगर-२ मध्ये रिषीका अपार्टमेंट समोरून एक ट्रॅक्टर (क्र.-एम एच १९ सी झेड ०५४३) वाळू घेऊन जात होते.
तलाठी सोनवणे यांनी ट्रॅक्टर अडविले आणि चालक व सोबत बसलेल्या व्यक्तीची विचारपूस केली. त्यावेळी या दोघांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी सोनवणे यांनी चालकाला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले. त्यावर आपण ट्रॅक्टर येणार नाही, असे सांगून दोघांनी तलाठी सोनवणे व पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. यावेळी ट्रॅक्टर पळवून नेण्यास सुरुवात केली. यावेळी सोनवणे व कर्मचारी ट्रॅक्टरला आडवे झाले असता चालकाने कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला तर चालकाच्या सोबत असलेल्या इसमाने लाकडी दंडुका काढून तलाठी सोनवणे यांच्या डोक्यावर टाकला व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाल्याने ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील वाळू रस्त्यावर उपसली यावेळी पोलीस व्हॅन दाखल झाल्याने ट्रॅक्टर सोडून दोघे जण पळून गेले.त्यानंतर तलाठी आशिष काकडे यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयावर आणले.
तलाठी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टरचालक व सोबत असलेल्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तांबे करीत आहेत.