ठार मारण्याच्या उद्देशाने तलाठ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 08:57 PM2020-10-10T20:57:26+5:302020-10-10T20:58:12+5:30
जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने चाकाखाली ...
जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याची कॉलर पकडून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने चाकाखाली ढकलून पलायन केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजता वावडदा ता. जळगाव येथे भरचौकात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी तहसीलदारांनी स्वतंत्र पथके नियुक्त केलेले आहेत. म्हसावद येथील तलाठी रामदास नेरकर, शिरसोली तलाठी भरत ननवरे, जळके येथील राहुल अहिरे, अनिरुद्ध खेतमाळीस व नितीन ब्याळे यांचे पथक नियुक्त शुक्रवारी रात्री म्हसावद भागात असताना रात्री दोन वाजता वावडदा चौफुलीवर विना क्रमांकाचे लाल रंगाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना दिसले. त्यास तलाठी राहुल अहिरे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर हळू केले नंतर तलाठी असल्याचे समजतात ट्रॅक्टर अंगावरून नेण्याचा प्रयत्न करुन पलायन केले.
पाठलाग करुन पकडले अन् परत निसटला
पथकातील इतर सहकाऱ्यांनी पाठलाग करुन हे ट्रॅक्टर पुढे अडविले चालकास नाव विचारले असता सागर विनायक चव्हाण ( रा. वावडदा, ता.जळगाव) असे सांगितले. यावेळी चावी देण्यास सांगितले असता सागर याने तलाठी अहिरे यांना पकडून ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली ढकलले अहिरे यांनी क्षणातच स्वतःला सावरले, त्यानंतर सागर याने तिथून ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. दरम्यान हा वाद होत असताना तलाठी भरती ननवरे यांनी मोबाईल मध्ये संपूर्ण घटनेचे चित्रण केलेले आहे शनिवारी संध्याकाळी या प्रकरणी सागर चव्हाण यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. संशयित फरार असल्याची माहिती विशाल सोनवणे यांनी दिली.