१५०० रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी व महिला कोतवालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 06:49 PM2023-04-14T18:49:57+5:302023-04-14T18:51:03+5:30
शेतजमिनीच्या उताऱ्यावर तक्रारदार व इतर नऊजण अशा १० वारसांची नावे लावण्याच्या मोबदल्यात तडवी याने २५०० रुपयांची मागणी केली होती.
प्रमोद ललवाणी
जळगाव - शेतजमिनीवर वारसांची नावे लावण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेणारा तलाठी व महिला कोतवाल यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी भोरटेक बुद्रुक (ता. भडगाव) येथे घडली.
तलाठी सलीम अकबर तडवी (४४, रा. भडगाव) आणि कोतवाल कविता नंदू सोनवणे, (२७, रा. तांदळवाडी, ता. भडगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तलाठी तडवी हे दोन दिवसांपूर्वीच भोरटेक येथे प्रभारी तलाठी म्हणून रुजू झाले होते.
तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेतजमीन भोरटेक बुद्रुक येथे आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यावर तक्रारदार व इतर नऊजण अशा १० वारसांची नावे लावण्याच्या मोबदल्यात तडवी याने २५०० रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक हजार रुपये जागेवरच घेतले होते. उर्वरित १५०० रुपयांची रक्कम त्यांनी शुक्रवारी पंचांसमोर घेतली. त्याचवेळी भोरटेक बुद्रुक तलाठी कार्यालयातच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.