तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 01:44 PM2024-08-07T13:44:19+5:302024-08-07T13:45:08+5:30
आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले.
जळगाव : अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून, तहसील कार्यालयात नेत असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने रस्ता अडवून ट्रॅक्टर पळविल्याची घटना सोमवारी कानळदा रस्त्यावर घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, तलाठी व शिपायाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले.
धक्काबुक्की करत ट्रॅक्टरवरून ओढले
शिपाई इक्बाल शेख हे ट्रॅक्टरवर बसले व ट्रॅक्टर चालकाला तहसीलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, चालकाने तलाठी यांच्या वाहनाला ओव्हरटेक करीत ट्रॅक्टर लाकूडपेठच्या दिशेने पळवून नेला. तलाठी राहुल अहिरे व शासकीय वाहन चालक हे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना एक इसम त्यांच्या वाहनाला आडवा झाला. त्याने वाहनचालक मनोज कोळी यांच्यासोबत झटापट केली आणि ट्रॅक्टरवर बसलेल्या इक्बाल शेख यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टवरुन खाली ओढीत ट्रॅक्टर पळवून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे