सतारीचे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:34 AM2018-07-08T01:34:32+5:302018-07-08T01:37:39+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्य संगीत आणि रजतपट’ या सदरात जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ उद्घोषिका आणि साहित्यिक डॉ.उषा शर्मा ह्या पंडित रविशंकर यांच्याविषयी लिहिताहेत...
कवी केशवसुत यांच्या उत्कृष्ट कवितांपैकी ही कविता एके रात्री विषण्ण मन:स्थितीत आत्मघात करण्याच्या प्रबळ विचाराने कवी काळोख्या रात्री बाहेर पडले आणि त्यांना एका खिडकीतून सतारीचे बोल ऐकायला मिळतात. प्रारंभी लक्ष जात नाही, पण पुढे हीच सतार त्यांची निराशा नष्ट करते. संकुचित जीवनाचा त्याग होतो आणि उरते ती तन्मयता...
शां त धरित्री, शांत नीशा ती
शांतच वारे, शांतच तारे
असा सुखे मी सदनी आलो
स्वप्नी स्वर ते... दिडदा... दिडदा...!
ही असते जादू भारतीय संगीतात.. या तंत्रीवाद्याची निर्मिती अमीर खुसरोने ‘तीन तार’ वाढवून ‘सहतार’ केली आणि अल्लाऊद्दीन खिलजीचा दरबार गाजवला असं म्हणतात.... पण आज ही सहतार म्हणजेच सतार जगभर निनादते आहे. आम जनतेच्या हृदयापर्यंतदेखील पोहोचली आहे.
हे उस्ताद शुजाअत खाँ, शाहीद परवेज, पंडित निखिल बॅनर्जी, बुधादित्य मुखर्जी, उस्ताद हलीम जाफर खाँ की पंडित रवी शंकर आहेत? असा प्रश्न रजतपटावर दिलीपकुमार यांना सतार वाजवताना पाहून निर्माण होतो किंवा आशातार्इंच्या या गीतामधे प्रत्यक्ष सतार कुणी वाजविली आहे. माझ्या मनी पियाची तार मी छेडिते.... संसार मांडिते? व्हॉटस्अपचा कधी कधी मला तरी फायदा झालाय. परवा एक अत्यंत दुर्मीळ अशी व्हिडीओ क्लिप मिळाली. देव आनंद आणि गीताबली यांची सरोद व सतारीची जुगलबंदी दाखविली आहे- (चित्रपट फेरी) मग पुन्हा प्रश्न... सरोदवर अजमद अली खाँ की शरण राणी? सतारीवर पंडितजी तर नाही?
शास्त्रीय संगीताचा राजदूत, भारतरत्न पंडित रवीशंकर अनेक छटांमध्ये अवतरित होतो. शास्त्रशुद्ध वादनात, जुगलबंदीत ‘जाझ’च्या बीटल्स समूहासोबत किंवा यहुदी मेनून यांच्या इस्ट वेस्ट मिलनात...
म.इकबाल यांचं सुपरिचित देशभक्तीपर गीत ‘सारे जहाँ से अच्छा’ कुणी स्वरबध्द केलं असणार याचं उत्तर शोधलं तर ते पंडितजी. १९४९ ते १९५६ या कालावधित पंडितजी आकाशवाणीत संगीत निर्देशक होते. मोठे भाऊ उदयशंकर यांच्या नृत्यसमूहात काही वर्षे युरोपला गेल्यानंतर त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला. भारतात परतले आणि ‘मल्हार’मध्ये गुरुकुल पद्धतीने धडे गिरवले.
ती सकाळची सभा होती, हातात ‘अनुराधा’ (१९६० चा रजतपट निर्देशक हृषीकेश मुखर्जी) ची इ.पी. होती. गीत प्रसारित केलं ‘सांवरे, सांवरे काहे मोसे करो जोरा जोरी...’ राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित हा सिनेमा बघायची परवानगी मिळाली होती आणि चित्रपटाच्या सर्व लख्ख बाबी लक्षात येत होत्या. सर्वात प्रथम भावलं ते टायटल सुरू असताना पूर्ण पडद्यावर मोठा वॉल्व्हचा रेडियो आणि दीदीचा मधाळ आवाज. शीर्षक आलं संगीतकार पं.रवीशंकर... भूमिका- बलराज सहानी (एक महत्त्वाकांक्षी डॉक्टर खेडेगावात जाऊन सेवा अर्पण करणारा), लीला नायडू (तत्कालिन मिस इंडिया आणि जगातील अत्यंत सुंदर अशा दहा महिलांमध्ये नावाजलेली अभिनेत्री) ही मूळात गायिका, परंतु अनावधानानं पतीकडून दुर्लक्षित झालेली. सारीच गीतं अत्यंत गोड. जाने कैसे सपनो मे खो गयी अखियाँ। हाय रे वो दिन क्यो ना आए। कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ?
पद्मभूषण, पद्मविभूषण, रोमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार,... राज्यसभा मानद सदस्य हे सारं आमच्यासारख्या सर्वसाधारण रसिकांच्या लक्षात येणार नाही. आम्हाला पाथेर पांचाली, अपराजितो, अपूर संसार, अप्पू नियोगी समजणार नाही पण पंडितजींचा ‘मीरा’ सतत भावणार ! १९७९ हा रजतपट अनेक वैशिष्ट्यांसाठी लक्षात राहतो. हेमामालिनी, विनोद खन्ना, श्रीराम लागू आणि श्रेष्ठ कलाकारांच्या भूमिका. भानू अथय्या यांची वेशभूषा, गुलजार यांचं निर्देशन आणि पंडितजींचं संगीत निर्देशन- संत मीराबाई यांची सर्व पदं वाणी जयराम यांच्या आवाजात आहेत. १) करुणा सुनो, २) करना फकिरी, ३) बादल देख डरी मै, ४) जागो बंसी वाले.... पण ‘जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे हे अप्रतिम गायलं आहे ते लतादीदीनं ‘झनक झनक पायल’ या चित्रपटासाठी. वाणी जयराम यांची मनस्वी क्षमा मागते... मी दीदीचा आर्त स्वर विसरू शकत नाही.... वाणी जयराम यांना त्यावर्षीचा ‘बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.
‘गांधी’ चित्रपटातील संगीतासाठी पंडितजींचं नाव आॅस्करसाठी नामांकित झालं होतं. हेदेखील आपण विसरू शकत नाही आणि ‘गोदान’ हा चित्रपटदेखील आपण केवळ मुंशी प्रेमचंद आणि पंडित रवीशंकर यांना सदैव स्मरणात ठेवतो, शेतकऱ्यांच्या समस्येवर आधारित हा सिनेमा गावाकडील सणवार संस्कृतीचं चित्र बिंबवतो आणि तो अधिक गहिरा होतो पार्श्वसंगीतामुळे- पिपरा के पतवा किंवा होरी खेलत नंदलाल ही महंमद रफी यांनी गायलेली गीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत- काही बांगला चित्रपट, काही आंग्ल भाषेतील तर अनुराधा, गोदान, मीरा यासारख्या हिंदी रजतपटांच्या माध्यमातून हा महान सतारवादक जनसामान्यांपर्यंत पोहोचला आणि हृदयस्थ झाला. सलाम त्याच्या स्वरांना! त्याच्या कलेला! परावृत्त करेल अनेक आत्मघाती विचारांना ...!
स्वप्नी स्वर ते येतील.... दिडदा दिडदा दिडदा...
- डॉ.उषा शर्मा, जळगाव