बोदवड, सावदा, निंभोरा रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात शेतक-यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:06 PM2018-02-03T12:06:20+5:302018-02-03T12:10:11+5:30
भूसंपादनासाठी हालचाली सुरू
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील बोदवड व रावेर तालुक्यातील सावदा व निंभोरा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारणीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या असून यासाठी भूसंपादनासंदर्भात 2 फेब्रुवारी रोजी शेतक:यांशी चर्चा झाली. यासाठी संबंधित शेतकरी अनुकूल असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
जिल्ह्यातील बोदवड, सावदा, निंभोरा येथे रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. या तीनही ठिकाणी उभारण्यात येणा:या पुलांसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. यामध्ये बोदवड पुलासाठी 5.11 हेक्टर, निंभोरा येथे 0.53 आर आणि सावदा पुलासाठी 3.1 हेक्टर जमीन लागणार आहे. जमिनीच्या संपादनासाठी त्या-त्या परिसरातील शेतक:यांच्या बैठका घेऊन त्यांना भूसंपादनासाठी तयार करण्याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयात गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, नगररचना विभागाचे बागूल, सोनवणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
आज झालेल्या प्राथमिक बैठकीत शेतक-यांना पुलाविषयी माहिती देण्यात आली असून त्यासाठी संपादीत केल्या जाणा:या जमिनीचाही तपशील त्यांना देण्यात आला आहे. जमीन देण्यासाठी शेतक:यांनी अनुकुलता दर्शविली असल्याची माहिती गाडीलकर यांनी दिली. तसेच इतरही शेतक:यांच्या बैठका घेऊन भुसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.