अमळनेर तालुक्यातील १५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:24 AM2019-02-05T00:24:00+5:302019-02-05T00:26:19+5:30
अमळनेर तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाणार आहे.
अमळनेर : गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून टँकरद्वारे मोफत थेट गावांपर्यंत पिण्याचे पाणी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ ३ रोजी तहसील कार्यालयाच्या परिसरात आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे पाणी पुरवले जाणार आहे.
श्री वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत असून चंद्रशेखर विजयजी म.सा. प्रेरित श्री सहस्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांचे अनमोल सहकार्य उपक्रमास लाभत आहे. शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, गटनेते प्रविण पाठक, शेतकी संघाचे माजी संचालक संजय पुनाजी पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, मंगरूळ येथील संदीप पाटील, गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह, महेंद्र श्रीराम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेतन शाह यांनी माहिती देताना सांगितले की, अमळनेर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती पाहता गुरांना पाणी मिळावे यासाठी दोन्ही गोशाळेच्या माध्यमातून व श्री वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवित आहे. यासाठी तूर्तास ५ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत टँकरसाठी महिन्याचा खर्च ८० हजार रुपये असून जलपूजन झाल्यानंतर ११ गावांना हे टँकर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोक्षेत्र प्रतिष्ठानचे ताराचंद खोना, दिलीप डेरे, गणेश वाणी,पंकज दोधीवाला, भैय्या पाटील, सतीश वाणी, विक्रम पाटील, डॉ. निलेश मोरे, मीना शाह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.