सातशेचे उद्दिष्ट, लस घेतली ४३२ कर्मचाऱ्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:43+5:302021-01-17T04:14:43+5:30
जळगाव : जे लस घेतील त्यांचे परिणाम नेमके काय समोर येतात हे बघू आणि नंतर लस घेऊ ही मानसिकता ...
जळगाव : जे लस घेतील त्यांचे परिणाम नेमके काय समोर येतात हे बघू आणि नंतर लस घेऊ ही मानसिकता अनेक कर्मचाऱ्यांनी बाळगल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याचे ७०० चे उद्दिष्ट बारगळले. यापैकी ४३२ जणांनीच सायंकाळी पाचपर्यंत लस टोचून घेतली. विशेष बाब म्हणजे, मोहिमेचा प्रारंभ हा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांच्यापासून करण्यात आला होता.
चाळीसगावात सर्वात कमी ४१ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. तर मुख्य केंद्र असलेल्या जीएमसीतही केवळ ५९ जणांनीच लस टोचून घेतली. जामनेर येथील केंद्रावर परिचारिका आशा तायडे यांना लस घेतल्यानंतर घशाला कोरड पडण्यासह खोकला आला. त्यांना तातडीने औषधोपचार करून अर्धा तासाने घरी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. अजून १९०१९ कर्मचाऱ्यांना लस देणे बाकी आहे.