जळगाव जिल्ह्यात एक गावठी पिस्तुल व दोन रिव्हाल्वरसह तरुण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:50 PM2017-12-11T20:50:47+5:302017-12-11T20:54:54+5:30
गावठी पिस्तुलचे केंद्र असलेल्या उमर्टी येथून एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस घेऊन आलेल्या अजयसिंग कल्याणसिंग बर्नाला (वय २१ रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी वैजापुर, ता.चोपडा येथे सापळा लावून ताब्यात घेतले. जळगावला आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११: गावठी पिस्तुलचे केंद्र असलेल्या उमर्टी येथून एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस घेऊन आलेल्या अजयसिंग कल्याणसिंग बर्नाला (वय २१ रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी वैजापुर, ता.चोपडा येथे सापळा लावून ताब्यात घेतले. जळगावला आणल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
जळगाव व धुळे जिल्ह्यात उमर्टी येथूनच चोपडामार्गे गावठी पिस्तुल व रिव्हाल्वरची तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या तस्करीतील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना केल्या होत्या. त्यानुसार कुराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक दोन दिवसापासून चोपडा तालुक्यात पाठविले होते. या पथकाने वैजापूर व परिसरात खबरे पेरले होते. उमर्टी येथील अजयसिंग हा वैजापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने गावात साध्या गणवेशात सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीच्या जागेवर अजयसिंग पोहचताच पोलिसांनी त्याला घेरले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल, दोन रिव्हाल्वर व तीन जीवंत काडतूस असा ८३ हजाराचा ऐवज मिळून आला.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
अजयसिंग याला वैजापूर येथून जळगावात आणण्यात आले. हे पिस्तुल कोण तयार करते, जळगाव जिल्ह्यात कोणामार्फत ग्राहकांना दिले जाते, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. सायंकाळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपासा स्थानिक गुन्हे शाखेने स्वत:कडेच ठेवला आहे.