तरसोद मंदिर तीन दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:18+5:302021-02-27T04:19:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने या काळात गर्दी होऊ नये म्हणून तरसोद देवस्थान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने या काळात गर्दी होऊ नये म्हणून तरसोद देवस्थान संस्थानच्यावतीने अंगारकी चतुर्थीच्या काळात १ ते ३ मार्च या तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दरम्यान ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुरु राहणार असल्याने गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.
जळगाव तालुक्यातील तरसोद येथील गणपती मंदिर गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा व इतर भागातूनही गणेश भक्त दर्शनासाठी येत असतात. यात चतुर्थी व त्यात अंगारकी चतुर्थीच्या काळात गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तरसोद गणपती संस्थाननेच पुढाकार घेत गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी व त्याच्या एक दिवस अगोदर व दुसऱ्या दिवशीही दर्शनासाठी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. मात्र कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णय संस्थानने घेतला आहे. या काळात गणेश भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष चंदन अत्तरदे यांनी केले आहे.