‘लखन’च्या कटेल्यांना ‘शबरी’च्या बोरांची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:53 AM2019-09-12T00:53:00+5:302019-09-12T00:53:23+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘नातं’ या सदरात आपल्या गुणवंत, मेहनती आणि काबाडकष्ट करून लिहिणाऱ्या एका विद्यार्थ्याविषयी लिहिताहेत प्रा.बी.एन.चौधरी...

The taste of the bakery of 'Shabari' to the slices of 'Lakhan' | ‘लखन’च्या कटेल्यांना ‘शबरी’च्या बोरांची चव

‘लखन’च्या कटेल्यांना ‘शबरी’च्या बोरांची चव

Next

आमच्या धरणगाव येथील पी.आर. विद्यालयातून नुकताच इयत्ता दहावी पास होऊन जळगावच्या आयटीआयमध्ये प्रवेशित झालेल्या लखनने आज हे कटेले पाठवले. वानोळा म्हणून. छे, छे... त्याच्या शेतातील नाही. तर त्याने रोजंदारीवर कामाला जाताना तेथे गोळा केलेले. वाचून दचकलात ना. पण हे खरं आहे. मित्रांनो, हल्ली बाजारात ते भरपूर आले आहेत. मात्र मात्र, आमच्या या आदर्श विद्यार्थ्याने प्रेमाने भेट म्हणून पाठवलेल्या या कटेल्यांचे सुदाम्याच्या पोह्यांशी आणि शबरीच्या बोरांशी थेट नाते आहे. या कटेल्यांचं बाजार मूल्य फार थोडं आहे. मात्र, त्या मागील त्याची भावना अमूल्य आहे. हे कटेले आज आम्ही सर्वांनी खाल्ले तर त्याला अक्षरश: शबरीच्या बोरांची गोडी वाटली. एखाद्या शिक्षकाला याहून मोठा पुरस्कार दुसरा असूच शकत नाही. तोही विद्यार्थ्याकडून. मी धन्य झालो.
लखन देवीदास चव्हाण हा पाचोरा तालुक्यातील लोहाºयाजवळील आदिवासी तांड्यावरचा. लाजरा, बुजरा व संकोची. घरात सर्व अशिक्षित. हा शिक्षणासाठी आमच्या शाळेत आठवीला आला. येथील संत दगाजी शासकीय वसतिगृहात राहण्याची व जेवणाची मोफत सोय झाली म्हणून. नियमित, शिस्तप्रिय, अभ्यासू, गुणी आणि समंजस असल्याने तो सर्वांचा लाडका झाला. त्याच्या वह्या, पुस्तकं, गाईडस, अपेक्षितं, मोफत मार्गदर्शन, परीक्षा फी आणि इतर सर्व खर्च आम्ही सर्वांनी उचलला. त्याने फक्त अभ्यास केला. सुटीत गावी शेतमजुरीची कामं केली. घरच्यांना हातभार लावला. वर्षभर त्याला आम्ही ‘रायझिंग स्टार’ म्हणूनच संबोधलं आणि परीक्षेत त्याने चक्क ८७ टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे कोणताही खासगी क्लास न लावता. त्याच्या कष्टाला यश मिळालं आणि आम्हाला समाधान. घरची परिस्थिती पाहून त्याने आयटीआय करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रांची जमवाजमव, अर्ज, फाटे करून झाले. यासाठी तो रोज धरणगावी येत जात होता. प्रवेश अर्ज भरला आणि त्याचा शासकीय आयटीआय, जळगावला नंबर लागला.
आजही तो शनिवार, रविवार शेतात काम करतो. हे करत असताना त्याने दिवसभरात काही कटेले जमा केले आणि लक्झरी बस ड्रायवरच्या हाती मला पाठवून दिले. हा निरोप दिला तेव्हा तो मला कागदपत्रे पाठवतो असं म्हणाला. शिपायाने थैली आणली आणि त्यातील हे कटोले पाहिले आणि मी मंत्रमुग्ध झालो. डोळ्यात पाणी तरळलं. हे आनंदाश्रू होते, कृतकृत्य झाल्याचे.
लखनला लेखन, वाचनाची आवड आहे. शाळेत येणाºया प्रत्येक वक्त्यांच्या भाषणाच्या त्याने नोट्स काढल्या आहेत. त्याच्या २०० पेजेस तीन वह्या भरल्या आहेत. तो रोजनिशी लिहतो. त्यासाठी त्याला नववर्षाला मी नियमित डायºया दिल्या. छान व्यक्त होतो तो. त्याला खूप समज आणि जाणीव आहे. तो भविष्यात मोठा अधिकारी होईल यात मला शंका नाही. त्याच्या होस्टेलची फी भरायची तयारीही मी दाखवली होती. मात्र विनम्रतेने त्याने ती नाकारली. पुढील काळात गरज पडेल तेव्हा मला हाक दे, असा सज्जड दमच भरलाय मी त्याला. खूप गोड छोकरा आहे तो. लखनकडे असलेली समंजस वृत्ती आणि अडचणी, संकटाला भिडण्याचं धैर्य कौतुकास्पद आहे.
महत्त्वाचं म्हणजे आपल्या परिस्थितीची व पालकांच्या कष्टाची त्याला जाण आहे. ८७ टक्के गुण मिळवूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. त्याने ठरवलं असतं तर तो अकरावी, बारावी किंवा डिप्लोमाही सहज करू शकला असता. मात्र, घरच्यांना लवकर मदत करू शकेल, असं शिक्षण त्यानं निवडलं. त्याच्या या निर्णयाचं मला अप्रूपच वाटलं.जळगावच्या शासकीय आयटीआयमध्येही तो प्रत्येकाचं मन जिंकून घेईल याची मला खात्री आहे. आयटीआयवरच तो थांबेल असं मला वाटत नाही. कारण त्याच्या अपेक्षा मर्यादित असल्या तरी त्याची क्षमता अमर्याद आहे. तिचा सुयोग्य उपयोग व्हावा हीच माझी इच्छा आहे.
असाच एखादा लखन तुमच्या आसपासही असेल. मित्रांनो, त्यास जीवापाड जपा. एक माणूस समाजात सकारात्मक ऊर्जा घेऊन ताठ मानेने उभा राहू शकेल. एक घर सावरू शकेल.
- प्रा.बी.एन. चौधरी, धरणगाव, जि.जळगाव

Web Title: The taste of the bakery of 'Shabari' to the slices of 'Lakhan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.