कर सल्लागार, सीएंनी काळ्या फिती लावून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:49+5:302021-01-13T04:40:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कर सल्लागार व सीए यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात केंद्रीय अर्थमंत्री व केंद्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कर सल्लागार व सीए यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात केंद्रीय अर्थमंत्री व केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ६०पेक्षा अधिक कर सल्लागार व सीए यांनी निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
कोरोना महामारीमुळे खूप लोकांना त्यांचे जमाखर्च वेळेत पूर्ण करता न आल्याने कर सल्लागार व सीए यांचेकडे देण्यास उशीर झाला. सरकारने या वर्षात जीएसटी कायद्यात तसेच विवरण पत्रक दाखल करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटमध्ये अचानक अनेक वेळा बदल केले. शिवाय सरकारने स्वत: करावयाच्या सर्व कामांसाठी याच सर्व कारणांनी मुदत मार्च २०२१ अखेर पर्यंत वाढवून घेतली. मात्र जनतेसाठी कोणतीही मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे सर्वच कर सल्लागार व सीए यांना गेल्या दोन महिन्यांपासून एकही दिवस सुट्टीचा न घेता सतत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर कायद्याखालील विविध विवरण पत्रके वेळेत दाखल करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. अनेक चुका होत आहेत. प्रचंड मानसिक तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे मुदतवाढ न दिल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री व केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा शहरातील ६० पेक्षा अधिक कर सल्लागार व सीए यांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी आवारात निषेध नोंदविला.