कराच्या बोझ्याने सुवर्णनगरीचा कणा वाकू लागला, केंद्र सरकार लक्ष देणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:23 PM2019-10-12T23:23:38+5:302019-10-12T23:24:36+5:30
विश्लेषण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जगात सोन्याची तस्करी वाढण्यासह केंद्र सरकारकडूनही सोन्यावरील कराचा बोझा वाढविला जात असल्याने देशभरात सोन्याची झळाळी पोहचलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सुवर्ण व्यवसायाला त्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. सुवर्ण व्यवसायातील सततचा चढ-उतार चिंतेचा विषय बनून पारंगत कारागिरांच्याही रोजगारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात वाढविलेले सीमा शुल्काचे दर कमी करण्याकडे केंद्र सरकार लक्ष देणार की नाही, असा प्रश्न सुवर्णनगरी जळगावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे.
जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे येथील सोने देशभरात पोहचून जळगावची ओळख सुवर्णनगरी अशी झाली आहे. त्यामुळे येथे सुवर्ण अलंकार घडविणाºया कारागिरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू लागला. परिणामी येथे जवळपास सात हजार बंगाली कारागिर स्थिरस्थावर झाले व सुबक कलाकुसरीचे अलंकार आकाराला येऊ लागले. इतकेच नव्हे दिवसेंदिवस येथील सुवर्ण व्यवसाय वृद्धींगत होऊन शहरात दीडशेच्यावर सुवर्णपेढ्या तयार होऊन अनेकांना यामाध्यमातूनही रोजगार मिळाला.
रुपयातील घसरणीने चिंता
सोन्याच्या भावावर सर्वात मोठा परिणाम होतो रुपयातील चढ-उताराचा. गेल्या काही दिवसांपासून तर रुपयात मोठी घसरण होऊ लागल्याने सोन्याचे भाव उच्चांकीवर पोहचले. २६ फेब्रुवारी रोजी अमेरिकन डॉलर उच्चांकीवर पोहचून ७२ रुपये प्रती डॉलर त्याचे भाव झाल्याने सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर हे भाव कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात केंद्र सरकारने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात थेट अडीच टक्क्याने वाढ केल्याने त्याच दिवशी दुपारी सोने ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले. तेव्हापासून सोन्याच्या भावात सतत वाढ सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसण्यासह व्यावसायिकही हवालदिल झाले.
तस्करी व्यवसायाला घातक
यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये पुन्हा दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन आॅगस्ट महिन्यात ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले. सोन्याच्या तस्करीमुळे भाववाढ तर होतच आहे, शिवाय या व्यवसायासाठी ही तस्करी घातक असल्याने सुवर्ण व्यावसायिकांची चिंता वाढविणारी आहे. सोन्यावरील करात होणाºया वाढीमुळ ेतस्करीही वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कारागिरांच्या रोजगारावर परिणाम
तस्करी पाठोपाठ केंद्र सरकारने सोन्याचे सीमा शुल्क १० टक्क्यांवरून थेट साडे बारा टक्के केल्याने त्याचा मोठा परिणाम सोन्याच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे कारांगिरांच्या कामावरही त्याचा परिणाम होऊन सात हजार कारागिरांच्या हाताला काम देणाºया सुवर्णनगरीतून बंगाली कारागिरही गावी परतू लागले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झेळ पोहचविण्यासह थेट व्यवसायावर परिणाम करणाºया व रोजगारीवर कुºहाड आणणाºया वाढीव कराचा बोझा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे गरजेचे असल्याचा सूर सुवर्णनगरीतून उमटत आहे.
सणासुदीमुळे उत्साह
दसरा-दिवाळी सणाच्या काळात सुवर्ण व्यवसायाला झळाळी येत आहे. मात्र ही झळाळी कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुवर्णनगरीचा परंपरागत व्यवसाय व या शहराची ओळख कायम राहण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी सुवर्ण व्यावसायिकांकडून होत आहे.