क्षयरोग दिन : बहुविध उपचार पद्धती ठरतेय क्षयरुग्णांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:02 PM2018-03-24T13:02:51+5:302018-03-24T13:02:51+5:30
जागरुकता महत्त्वाची
जळगाव : पूर्वी असाध्य समजल्या जाणाऱ्या क्षयरोगावरील बहुविध औषधोपचार पद्धतीने आता त्याचा प्रसार रोखता येणे शक्य असून कमी कालावधीत उपचार मिळणारी ‘डॉटस्’ उपचार पद्धती क्षयरुग्णांना वरदान ठरत आहे. या सोबतच आता जिल्हा रुग्णलायात ‘सीबी नॅट’ ही अत्याधुनिक मशिन आल्याने त्याद्वारे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी जागृकता महत्त्वाची असून लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करणे गरजेचे आहे. या जागृकतेमुळे रुग्णाचा जीव वाचून इतरांनाही त्याचा संसर्ग होऊ शकत नाही.
‘डॉटस्’ उपचार पद्धती वरदान
‘डॉटस्’ औषधोपचार पद्धती मोठी फायदेशीर ठरुन त्याचे फायदेही अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ही पद्धती क्षयरुग्णांना वरदान ठरत आहे. ही पद्धती सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. यासाठी दवाखान्यात दाखल होण्याची गरज नसते. केवळ गंभीर रुग्णांनाच दाखल व्हावे लागते. पूर्वी क्षयरुग्णाला १८ ते २४ महिन्यांपर्यंत औषधी घ्याव्या लागत होत्या, आता या पद्धतीत केवळ ६ ते ९ महिन्यांपर्यंतच उपचार घ्यावे लागतात.
जळगाव जिल्ह्यात ३५०० रुग्ण
जळगाव जिल्ह्यात यंदा ३५०० रुग्णांची नोंद आहे. गेल्या वर्षी ही संध्या ३००० हजार होती. सध्या जागृतीमुळे नागरिक सतर्क होऊन निदान करू लागल्याने व अत्याधुनिक साधनांमुळे लवकर निदान होऊन लागल्याने ही संख्या वाढताना दिसते.
रुग्णांना आहाराची मदत
क्षयरोग रुग्णांना मोफत औषधी तर मिळते, मात्र त्यासाठी आहाराचीही गरज असते. हे ओळखून एकता पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडिया यांनी पुढाकार घेऊन अशा रुग्णांना मोफत आहार देण्यास सुरुवात केली आहे. एका रुग्णाला एका महिन्याला साधारण १०७५ रुपयांचा आहार लागतो, तो दात्यांच्या मदतीने बरडिया उपलब्ध करून देत आहेत. अशा रुग्णाना मदत व्हावी म्हणून कुटुंबातील वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस व इतर औचित्य साधून नागरिकांनी पुढे यावे, असेही बरडिया यांचे म्हणणे आहे.
क्षयरोग आता असाध्य रोग राहिलेला नाही. त्याच्या आधुनिक उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत. क्षयरोगाची लक्षणे दिसताच निदान करून घ्यावे व उपचार पूर्ण करावे.
- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी.