टीबी रुग्णांचे पोषण लटकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:28+5:302021-08-14T04:20:28+5:30
बँक खात्यामुळे अडचणी : पोषण आहार भत्ता देण्यासाठी शोधाशोध जळगाव : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक ...
बँक खात्यामुळे अडचणी : पोषण आहार भत्ता देण्यासाठी शोधाशोध
जळगाव : क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. मात्र अनेक रुग्णांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने हा भत्ता त्यांना मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्याकडे बँक खाते नाही त्यांच्या नातेवाइकांचा शोध अखेर क्षयरोग विभागाकडून घेतला जात आहे. त्यामुळे या रुग्णांचे पोषण या तांत्रिक बाबीमुळे लटकले आहे.
जिल्ह्यात मध्यंतरी क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यात अनेक रुग्ण समोर आले होते. यात या रुग्णांचे नमुने व एक्सरे काढून त्यांचे निदान करण्यात आले होते. जिल्हा क्षयरोग विभागाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते जुलैपर्यंत १७७८ नवीन रुग्ण समोर आले होते. दरम्यान, काही तांत्रिक बाबींमुळे क्षयरोग रुग्णांपर्यंत मदत पोहचत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, क्षयरुग्णांपैकी ५५ टक्के रुग्णांपर्यंत हा भत्ताच पोहचत नसल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील क्षयरोगी - १७७८
भत्ता किती जणांना मिळतो -८८८
न मिळणाऱ्यांचे प्रमाण -५५ टक्के
टीबीची लक्षणे काय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला असेल, खोकल्यातून रक्त येत असेल, वजन अचानक कमी होत असेल, सायंकाळी ताप येत असेल ही क्षयरोगाची लक्षणे असतात, असे डॉक्टरांनी सांगितले. काही रुग्णांना अधिक लक्षणे असतात त्यांच्या थुंकीची तपासणी केली जाते तसेच एक्सरे काढून त्यांचे निदान केले जाते.
क्षयरोग दोन प्रकारचे
क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. काहींमध्ये साधा क्षयरोग असतो. हे रुग्ण सहा महिन्यांच्या कालावधीतही क्षयरोग मुक्त होऊ शकतात. तर काहींना हा आजार गंभीर असतो. त्याला एमडीआर असे संबोधले जाते. अशा रुग्णांना हा आजार दोन वर्षांपर्यंतही राहू शकतो. निदानानंतर हे समोर येत असते.
कोट
शासनाकडून ५०० रुपये पोषण आहार भत्ता या रुग्णांना मिळतो. आपण तो थेट त्यांच्या बँक खात्यावर टाकत असतो. अनेक वेळा बँक खाती नसल्याने त्यांना हा भत्ता देण्यास अडचणी येतात. त्यामुळे शक्यतोवर आम्ही आधी रुग्णांकडून बँक खाती घेत असतो. - डॉ. इरफान तडवी, प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी