खंडणी प्रकरण : सुनील झंवर यांच्याकडील ‘ते’ घड्याळ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:23 AM2023-02-12T11:23:08+5:302023-02-12T11:23:31+5:30
खंडणी प्रकरण : दोन बिल्डरांचेही जबाब नोंदविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सूरज सुनील झंवर यांच्याकडून १ कोटी २२ लाखाची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात शनिवारी एसआयटीने सुनील झंवर यांच्याकडील ऑडीओ व व्हिडीओ चित्रीकरण झालेले घड्याळ गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त केले. त्याशिवाय विठ्ठल तानाजी पाटील व अमित रमेश अविनाशे (दोन्ही रा.पुणे) यांचा जबाबही नोंदविण्यात आला.
सूरज झंवर यांच्याकडून खंडणी स्वरुपात स्विकारलेली ही रक्कम परत मागण्यासाठी सुनील व सूरज झंवर चाळीसगाव येथील उदय पवार याच्या गोदामात गेले होते. तेव्हा पवार तेथे नव्हता, मात्र त्याच्या गोदामातील कर्मचाऱ्याने झंवर यांचे बोलणे करुन दिले होते. त्यावेळी जे संभाषण झाले ते सुनील झंवर यांनी घड्याळात चित्रीकरण केले आहे. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनील झंवर कारागृहातून जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर मार्च महिन्यात झंवर उदय पवार याच्याकडे खंडणी स्वरुपात घेतलेले पैसे परत मागायला गेले होते. त्याआधी कजगाव येथेही भेट घेतली होती. याच कालावधीत विधीमंडळात तेजस मोरे व ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यातील संभाषणाची क्लीप देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली होती.
संशयास्पद व्यवहाराच्या नोंदी
बांधकाम व्यावसायिक अमित रमेश अविनाशे व ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पत्नी ज्योत्स्ना यांनी मिळून ब्रम्हराज इन्फोसेस एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली होती. अमित यांना एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. ६ फेब्रुवारी रोजी समन्स मिळताच ७ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या खात्यावरुन एक ते दीड कोटी रुपये ट्रान्सफर झाले. या संशयास्पद व्यवहाराची चौकशी केली जात आहे. दुसरे बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पाटील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांचा मुलगा असून त्यांचाही दीड पानाचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे.