जळगावात चहा पिण्यापूर्वीच महिलेवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:37 PM2017-08-09T12:37:34+5:302017-08-09T13:07:37+5:30
घर कोसळून करूण अंत : घरातील सदस्य बाहेर असल्याने बचावले
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - सकाळी घरात चहा करीत असताना अचानक मातीचे घर कोसळून ढिगा:याखाली दाबल्या गेल्याने सुमित्राबाई अशोक पाटील (वय 52, रा. पिंप्राळा, जळगाव) या महिलेचा मृत्यू झाला. घरातच दुस:या खोलीत त्यांच्या सासू भिकूबाई ननसिंग पाटील (वय 75) यादेखील होत्या. मात्र त्यांना थोडा मार लागून त्या जखमी झाल्या. घरातील इतर तीन सदस्य बाहेर असल्याने ते बचावले.
शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे अशोक ननसिंग पाटील व सुमित्राबाई पाटील हे पिंप्राळा गावातील कुंभारवाडा परिसरात गेल्या 12 वर्षापासून मातीच्या घरात राहतात. नेहमीप्रमाणे सुमित्राबाई बुधवारी सकाळी झोपेतून उठल्या व सकाळी साडेसहा वाजेदरम्यान चहा करीत होत्या. त्याच वेळी मातीचे धाब्याचे घर कोसळले व मातीच्या ढिगा:याखाली त्या दाबल्या गेल्या. याच वेळी त्यांच्या सासू दुस:या खोलीमध्ये पलंगावर झोपलेल्या होत्या. त्यांना यात किरकोळ इजा झाली. घरातील सुमित्राबाई यांचे पती अशोक पाटील, मुलगी राजश्री (22) व भाचा गणेश सदाशिव पाटील हे घरा बाहेर दात घासत होते. त्यामुळे ते यातून बचावले.
या वेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन मातीच्या ढिगा:यातून महिलेला बाहेर काढले व खाजगी रुग्णालयात हलविले. तेथे मात्र या महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेत चहा पिण्यापूर्वीच या महिलेवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.