शिक्षकांची उपस्थिती आता होणार ५० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:30 PM2021-03-16T21:30:14+5:302021-03-16T21:31:05+5:30
शिक्षक कोरोनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने आता शाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : तालुक्यात दिनांक १५ मार्च रोजी १०७ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना ही बातमी दि. १६ मार्चच्या ‘लोकमत’च्या अंकात प्रसिध्द झाली अन् जळगाव जिल्ह्यासह शिक्षण विभागतील अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला.
जळगाव जिल्हा परिषदेमधील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश सोशल मीडियावर तात्काळ व्हायरल करण्यात आला आहे. यापूर्वी गेल्या पंधरवड्यात जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी यांनी शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करावा, असा अट्टाहास धरला. त्यावेळी शिक्षक संघटनांनी, मुख्याध्यापक संघटनांनी विरोध नोंदवला होता. परंतु त्याकडे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळेच शिक्षक पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आता मात्र वेळ निघून गेल्यानंतर दि. १६पासून शाळा-शाळांमध्ये केवळ पन्नास टक्केच शिक्षक उपस्थित राहतील, असा आदेश काढलेला आहे.
नुसते शिक्षक पॉझिटिव्ह नसून त्यांच्या घरातले कुटुंबातील सदस्यही पॉझिटिव्ह झालेले आहेत. जर शाळाबाह्य मुलांचा सर्वे रद्द करून त्यावेळी थांबवले असते, तर कदाचित चोपडा तालुक्यात हा कोरोनाचा प्रसार झाला नसता. शिक्षक संघटना या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक आणि संतप्त झालेले आहेत. केवळ शिक्षणाधिकाऱ्यांनी न ऐकल्यामुळे शिक्षकांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही होऊ लागलेला आहे.
माध्यमिक पतपेढीचे संचालक दोनदा पॉझिटिव्ह
दरम्यान जळगाव येथील जिल्हा माध्यमिक शिक्षकांची पतपेढीमध्ये संचालक असलेले व लासूर येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले आर. एल. बाविस्कर यांना पुन्हा कोरोनाने कवेत घेतले आहे. यापूर्वी गेल्या दोन महिन्याभरापूर्वी ते पॉझिटिव्ह झाले होते आणि सध्याही ते पॉझिटिव्ह असून घरातच विलगीकरण कक्षात थांबलेले आहेत. शाळाबाह्य मुलांचा सर्वे केल्यानेच मी पॉझिटिव्ह झालो असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
केवळ प्राथमिक शिक्षक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे आणि जिल्हाधिकारी यांनी शिक्षक संघटनांनी मागणी करूनही शाळाबाह्य मुलांच्या सर्वेचे कार्य थांबविले नसल्यामुळेच जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्त शिक्षकांचे प्रमाण वाढलेले आहे.
एस. डी. भिरूड, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ