होमवर्क न केल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; शर्ट काढून उभे केले वर्गात
By सागर दुबे | Published: September 2, 2022 06:06 PM2022-09-02T18:06:25+5:302022-09-02T18:07:17+5:30
शर्ट काढून उभे केले वर्गात ; पालकांनी केली शिक्षिकेविरूध्द तक्रार दाखल
जळगाव : होमवर्क केला नाही म्हणून एका खाजगी क्लासमधील शिक्षिकेने चौथीच्या विद्यार्थ्याला त्याचे शर्ट काढून चापटांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खाजगी क्लास असून याठिकाणी ९ वर्षीय इयत्ता चौथीत शिकणारा अजय (नाव बदलेले) याने क्लास लावला आहे. मात्र, क्लासमध्ये आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार अजय याने वडीलांकडे केली होती. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे अजय हा क्लासमध्ये आला. परंतू, होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेने अजय याचे कपडे काढून त्यास चापटांनी मारहाण केली. क्लास सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानक अजयच्या वडीलांना मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी अचानक क्लासच्या वर्गात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना मुलगा रडतांना आणि शर्ट विना दिसून आला. पालक समोर येताच शिक्षिकेने विद्यार्थ्यास शर्ट परत दिले. या प्रकाराचे व्हीडिओ पालकाने केले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाला मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे.