शिक्षक मुलाला कोरोनाची बाधा, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; तर पतीच्या धक्क्याने पत्नीने सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:01 PM2021-03-31T17:01:56+5:302021-03-31T17:02:19+5:30
शिक्षक मुलाला कोरोनाची बाधा, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; तर पतीच्या धक्क्याने पत्नीने प्राण सोडल्याची घटना फैजपूर येथे घडली.
वासुदेव सरोदे
फैजपूर : तरुण शिक्षक मुलाला कोरोनाची लागण झाल्याच्या धक्क्याने सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत पांडुरंग काळकर (६७) यांचे निधन झाले तर पतीच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या पत्नीला वेदना असह्य होऊन पुष्पा शशिकांत काळकर (वय ६३) त्यांनीही आपले प्राण सोडले. अवघ्या चार दिवसाच्या अंतराने या घटना घडल्या व समाजमन सुन्न झाले.
शहरातील शिव कॉलनी परिसरात हे काळकर कुटुंब वास्तव्याला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील महामारीत केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. कुटुंबचे कुटुंबच आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे काळजी घेणे हा एकमेव पर्याय आता शिल्लक राहिलेला आहे.
मूळ अमळनेर येथील रहिवासी असलेले शशिकांत काळकर हे खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. ते परिवारासह शहरातील शिव कॉलनीत वास्तव्याला होते. अतिशय सोज्वळ व मनमिळावू असे कुटुंब. मात्र या कुटुंबालाही दृष्ट लागली. गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी काळकर यांचा तरुण शिक्षक मुलगा अनिकेत याला कोरोना झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते तर वृद्ध आई-वडिलांची काळजी म्हणून त्यांना जळगावी मुलीकडे पाठविण्यात आले होते. मात्र दि.२४ रोजी मुलाला कोरोना झाल्याच्या धक्क्याने शशिकांत काळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेतून काळकर कुटुंब सावरत नाही; तोच पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने काळकर यांच्या पत्नी पुष्पा काळकर यांनी आपले प्राण सोडले व अवघ्या चार दिवसात होत्याचे नव्हते झाले. काळकर दाम्पत्यावर जळगावी मुलीकडे अंत्यसंस्कार करण्यात आले.
काळकर दांपत्याचा मुलगा अनिकेत हा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडला आहे. ते धुळे येथील नातेवाईकांकडे सध्या राहात आहे. मात्र आज बरे होऊन परतल्यावर त्यांना पाहण्यासाठी आई-वडील नाही ही खंत कायमच स्मरणात राहणार आहे.
शशिकांत व पुष्पा काळकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.