खिर्डी येथील शिक्षकाने वाचवले विजेच्या धक्क्यातून वृद्धाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:06+5:302021-05-28T04:13:06+5:30
दोन दिवसांपासून शिक्षक कॉलनी परिसरातील ट्रान्सफाॅर्मर जळाला असल्याने येथील नागरिक रात्रभर अंधारात होते. वीज गायब झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे उकाडा ...
दोन दिवसांपासून शिक्षक कॉलनी परिसरातील ट्रान्सफाॅर्मर जळाला असल्याने येथील नागरिक रात्रभर अंधारात होते. वीज गायब झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे उकाडा झाल्याने शिक्षक कॉलनी परिसरातील दुसरे ट्रासफाॅर्मर सुरू होते. त्यामुळे काही भागात वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. अशा वेळी सुरेश तावडे यांनी आपल्या शेजारील घरातून वीज कनेक्शन जोडले. संध्याकाळी वीज केबल घरात जोडत असताना वीजप्रवाह सुरू झाला. तेव्हा त्यांच्या हातात विजेची चालू केबल पकडली गेली. परिणामी त्यांना विजेची वायर हाताला चिकटली. त्यांनी आरोळ्या मारल्या. तेवढ्यात शिक्षक प्रवीण धुंदले यांनी जीवाची पर्वा न करता लाकडी काठीने वीजपुरवठा सुरू असलेली केबल बाजूला सारली. तेवढ्यात सुरेश तावडे जमिनीवर पडले. विजेच्या धक्क्याने त्यांचा श्वासोछ्वास बंद पडला. रफीक शेख यांनी त्यांच्या नाकातोंडात फुंका मारल्यामुळे त्यांचा श्वास पुन्हा सुरू झाला. त्यामुळे तावडे हे शुद्धीवर आले. लगेच डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार केले. यात तावडे यांच्या हाताला विजेच्या धक्क्याने दोन ठिकाणी जखमा झाल्या. ते सुखरूप असून, बचावले आहेत. शिक्षक प्रवीण धुंदले यांनी जीवाची पर्वा न करता सुरेश तावडे यांचे प्राण वाचवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
ऐन बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणून सुरेश तावडे यांचे विजेचा धक्का लागून झालेल्या अपघातात प्राण वाचवल्याचा मनस्वी आनंद मला वाटतो.
- प्रवीण धुुंदले, शिक्षक, खिर्डी बुद्रूक