विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वाहिली पीडितेला श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 08:12 PM2020-02-10T20:12:53+5:302020-02-10T20:39:47+5:30
हिंगणाघट जळीत प्रकरण : आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
जळगाव : महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडीतेची सोमवारी प्राणज्योत मालवली. तर पीडितेला एनएसयूआय संघटनेचे जिलध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आग भिजवून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर सोमवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. या पीडितेला गोदावरी महाविद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली तर राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी हिंगणघाट जळीत प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच अॅड़ उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपविण्यात यावे, अशी मागणी यावेळी एनएसयूआयतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे़ दरम्यान, श्रध्दांजली कार्यक्रमात वैभव तारले, चेतन बर्डे, शुभम तिफने, भावेश पाटील, पूजा तीफने, मोनिका मोरे, तुषार पाटील, रोहन नारखेडे, सनी भारंबे, सुरज राजपूत, प्रतीक खर्चे, मयुर पाटील, भुपेंद्र भारंबे आदींची उपस्थिती होती.