पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची होतेय दमछाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:31 PM2021-02-02T19:31:08+5:302021-02-02T19:31:24+5:30
ग्रामीण भागात उपस्थिती कमी : विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी
जळगाव : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय परिसर गजबजू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत संपूर्ण नियमांचे पालन होताच दिसून येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५६ शाळा असून त्यामध्ये ३ लाख ३४ हजार ८५२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरम्यान, गेल्या दहा महिन्यानंतर २७ जानेवारीला इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या़ पहिल्या दिवशी जिल्हाभरातील ८२ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व शाळांमध्ये केले गेले. आजही विद्यार्थ्यांची तपासणी, सोशल डिस्टन्सिंग पालन, परिसर स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, तोंडावर मास्क आदी सर्व बाबींचे तंतोतंत पालन शाळा व्यवस्थापन करीत आहे. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्याचा आनंद सुध्दा चेह-यावर दिसून येत आहे. परंतु, असे असताना सुध्दा पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळताना शिक्षकांची दमछाक होत आहे. वर्गातून शिक्षक तासिका घेवून नजरेआड होताच एक दुस-याशी बोलणे, खेळणे, एकमेकांच्या बाकावर बसणे, तोंडावरून मास्क काढणे याबाबी आता वर्गात होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी कितीही सांगितले तरी ते तेवढ्यापुरते ऐकत असल्याने आता पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे जाणवत असले तरी ग्रामीण भागात पालकांमध्ये अजूनही मनात भीती आहे. काही पालक संमतीपत्रक देण्यास तयार नसून शिक्षकांवर जबाबदारी टाकून मोकळे होत आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा अशी अट आहे. मात्र, अनेक दिवसानंतर मुले शाळेत आल्याने शिक्षक वगार्बाहेर गेले तर विद्यार्थी एकत्र जमा होतात.
- विजय बागुल, पदवीधर शिक्षक
शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे का?, मास्क लावला आहे का? याकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र, शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेह-या दिसून येतो़ विद्यार्थी सुध्दा स्वत:ची काळजी घेतात.
- राजीव वानखेडे, पदवीधर शिक्षक
पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जाते. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजून वर्गात प्रवेश दिला जातो. जेवणाचा डबा आणण्यास मनाई केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळली जाईल, याची खबरदारी घेतली जाते. काही प्रमाणात दमछाक होते.
- मानव भालेराव
- जिल्ह्यातून एकुण शाळा
२०५८
- जिल्ह्यातील पाचवी ते आठवी एकूण विद्यार्थी
३ लाख ३४ हजार ८५२
- एकूण शिक्षक
११ हजार ९७९