जळगाव येथे शिक्षक मतदारसंघ मतदानासाठी पैसे घेताना गुरूजींना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:05 PM2018-06-26T12:05:43+5:302018-06-26T12:05:58+5:30
वाद पोलीस स्टेशनपर्यंत
जळगाव : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जळगाव शहरात असलेल्या आर.आर. विद्यालय व भा.का. लाठी विद्यालयातील ४ केंद्रांवर मतदान केंद्रांवर सोमवार, २५ रोजी शांततेत मतदान झाले. एकूण ८२ टक्के मतदान झाले. मात्र सायंकाळी मतदान संपण्यास जेमतेम अर्धा तास उरलेला असताना मतदानासाठी गुरूजींना पाकिटात पैसे वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधीत गुरूजींना व पैसे देणाऱ्यास पकडून जिल्हा पेठ पोलिसस्टेशनला नेण्यात आले. तर एक जण फरार झाला. मात्र नंतर आपसात वाद मिटवण्यात आल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
जळगाव तालुक्यासाठी जळगाव शहरात आर.आर. विद्यालय व भा.का. लाठी विद्यालयातील ४ मतदान केंद्र होते. एकाच संख्येच्या आवारात ही चारही केंद्र असल्याने सर्व मतदार येथेच जमत होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ७ ते ९ यावेळात ७.८० टक्के मतदान झाले होते. मात्र त्यानंतर मतदारांचा प्रतिसाद वाढला. ९ ते ११ या वेळात मतदारांची गर्दी वाढली. आर.आर. विद्यालयातील मतदान केंद्र क्र. ३९ वर तर मतदारांची रांग लागली. ११ वाजेपर्यंत २२.१० टक्के मतदान झाले होते. ११ ते ५ या वेळात मतदानाने आणखी गती घेतली. दुपारी ३ नंतर तर गर्दी भरपूर वाढली होती.
सर्वच उमेदवारांचे बुथ
स्टेट बँकेकडून आर.आर. शाळेकडे जाणाºया रस्त्यावर सर्व उमेदवारांनी बुथ उभारले होते. राष्टÑवादीच्या बुथवर माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष निलेश पाटील, विलास भाऊलाल पाटील, मिनल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीश महाजनांचीही उपस्थिती
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही दुपारी भाजपाच्या बुथवर हजेरी लावली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसानेही हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच जलसंपदामंत्री व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झुणका भाकरचा आस्वादही घेतला.
दोन गटातील वाद पोलिसांनी जागेवरच मिटवला
आधी भिरुड गटावर पैसे वाटपाचा आरोप होता. दरम्यान पैसे वाटप करताना पकडल्याचा वाद शमतो न शमतो तोच भिरूड गटातील एका समर्थकाने आपसात बोलताना बेडसे गटाकडून पैसे वाटल्याचा उल्लेख करताच बेडसे गटाच्या कार्यकर्त्याने आक्रमक पवित्रा घेत चुकीचे आरोप करू नका, असे बजावले. त्यामुळे लगेचच दोन्ही बाजूच्या समर्थकांची गर्दी जमली. उमेदवार एस.डी.भिरूड हे देखील तेथे धावले. पोलिसांनी समजूत घालून वाद तेथेच मिटवला.
गुरूजींना पैशांचा लोभ
भावी पिढी घडविणाºया शिक्षकांनी शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतदानासाठी उमेदवारांनी शिक्षक मतदारांना पैठणी, पैशांचे आमिष दाखविल्याचे आरोप आधीपासूनच सुरू होते. मात्र सोमवारी, मतदानाच्या दिवशी देखील मतदान संपण्याच्या तासभर आधी खुलेआमपणे पाकीटातून पैशांचे वाटप केले गेले. एका उमेदवारचे कार्यकर्ते पांढºया रंगाच्या पाकिटात २१०० रूपये घालून ते मतदानासाठी जाणाºया उमेदवारांच्या हातात देताना दुसºया उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी पकडले. तर दुसरा कार्यकर्ता पळून गेला. पैसे घेणारा शिक्षक मतदार व पैसे देणारा कार्यकर्ता यांना तक्रारदार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र तेथे आपसात वाद मिटवण्यात आला. मात्र या प्रकारामुळे पोलिसांनी मतदान केंद्राजवळून ये-जा करणाºयांचीच झडती घेतली.