शिक्षक दिन विशेष : पालकांनी इंग्रजी शाळेतून काढून मुलांना घातले जिल्हा परिषदेच्या शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:07 PM2018-09-05T13:07:39+5:302018-09-05T13:08:44+5:30
लोकसहभागातून जमविले १२ लाख
सागर दुबे
जळगाव : सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत असताना सावखेडा खुर्द गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मात्र त्यास अपवाद ठरली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून काही मुले या जि.प.शाळेत परतली आहे. कदाचित ही पहिली जि.प. शाळा असावी.
जळगावपासून २४ किलोमिटर अंतरावर तापीनदीच्या काठावर असलेल्या सावखेडा खुर्द येथे सन १९५५ मध्ये जि़प़शाळेची स्थापना झाली आहे़ मध्यंतरी पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यम व शहरातील शाळांकडे वाढल्यामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडल्या होत्या. दरम्यान, मुख्याध्यापक चौधरी यांनी शाळेत विविध विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवून शाळेचा लौकीक वाढविला आहे. जि.प.प्राथमिक शाळेने आपले वेगळेपण सिध्द करत जे खाजगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांचा शाळांना जमले नाही, ते करुन दाखविले आहे. विद्यार्थ्यांना दर्जदार शिक्षण मिळत असल्यामुळे बाहेरील शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा या शाळेत प्रवेश घेतले आहे़
या शाळेत तब्बल वर्षभरात शंभर विविध उपक्रम राबविण्यात येतात़ मुख्याध्यापक अरूण चौधरी यांनी शाळेचे चित्रच बदलून टाकले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील पालकांकडून आपल्या पाल्यांचे प्रवेश सावखेडा खुर्द जि.प.शाळेत व्हावेत यासाठी प्रयत्न असतात.
लोकसहभागातून जमविले १२ लाख
शाळा डिजीटल होण्यासाठी व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेचे शिक्षण मिळावे यासाठी लोकसहभागातून तब्बल १२ लाख रूपये अरूण चौधरी यांनी जमविले़ त्यातून शाळेला रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी खेळणी, संरक्षण भिंती, विद्युत उपकरणे, डिजीटल शिक्षणाची साहित्य खरेदी करून शाळेची नवीन निर्मिती केली़ विद्यार्थ्यांना गणेश सुध्दा मोफत देण्यात आले आहे़ दोन दिवसाआड तीन वेगवेगळी गणवेश विद्यार्थी परिधान करून शाळेत येत असतात़
सौर शाळा बनविणार
ग्रामीण भाग असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत असते़ त्यामुळे लोकसहभागातून ही शाळा सौरशाळा बनविण्याचा ध्यास आता मुख्याध्यापक चौधरी यांनी केला आहे़
यामुळे वीज ही समस्याच राहणार नसल्यामुळे संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा डिजीटलचे धडे घेणाºया विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण यातून निर्माण होणार नाही़
ग्रामस्थांनी दिली साथ
जिल्ह्यात आदर्श ठरणारी सावखेडा खुर्द जि़प़ शाळेच्या स्थितीला सुधारण्यासाठी गावातील शेतकºयांसह ग्रामस्थांनी चौधरी यांना साथ अर्थात मदत मिळाली़ एक आदर्श आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शाळा कशी असावी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर अरुण चौधरीच्या प्रयत्नांना मदत करण्याची तयारी दर्शविली. अन् आज इंग्रजी शाळेऐवजी या शाळेत पाल्यांचा प्रवेश व्हावा,यासाठी पालक या शाळेत धाव घेतात़
जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकन शाळा
४अरुण चौधरी हे सावखेडा येथे रुजू झाल्यावर या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही बोटावर मोजण्या इतपत होती. त्यामुळे जि.प.शाळेत मुलांची संख्या वाढविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. अरुण चौधरींनी आपल्या सहकाºयांसोबत शाळेत विविध उपक्रम राबविले सोबतच विद्यार्थ्यांना डिजीटल धडे दिले़ यातून विद्यार्थी संख्येत वाढ होऊन इतर शाळांना मागे टाकत पुढे निघाली, अन् अखेर जिल्ह्यातून पहिली ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी सावखेडा खुर्द ही पहिली जि़प़शाळा ठरली़
दप्तरमुक्त शाळा़़़ सावखेडा खुर्द जि़प़ शाळा ही जिल्ह्यातून आयएसओ मानांकनासह दप्तरमुक्त शाळा ठरली आहे़ विद्यार्थ्यांना शिक्षणात रस वाढावा व मनोरंजक पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला टॅब देण्यात आली आहेत़ त्यामुळे ही शाळा दप्तरमुक्त झाली आहे. सुरुवातीला चौधरी यांनी स्वखर्चाने टॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. त्यानंतर गावातील मोठ्या शेतकºयांनी व शिक्षण विभागाने देखील विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले. अरुण चौधरींच्या याच कल्पक उपक्रमांची दखल जिल्हा परिषदेने घेत त्यांना २०१५ यावर्षी जि.प.कडून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे़